दिवसेंदिवस ताफ्यातील विमाने, उड्डाणांची संख्या कमी होणाऱ्या जेट एअरवेजच्या वित्त पुरवठय़ाचा तिढा कंपनीला कर्ज देणाऱ्या बँकांच्या सोमवारच्या बैठकीतही सुटू शकला नाही. याबाबत बँक व्यवस्थापनाची पुन्हा मंगळवारी बैठक होत आहे.

दरम्यान, जेट एअरवेजमध्ये सर्वाधिक हिस्सा मिळविणाऱ्या स्टेट बँकेने तातडीने १,५०० कोटी रुपये द्यावेत, असे सुचवित कंपनीच्या कर्मचारी, वैमानिकांनी आपल्या ‘काम बंद’ आंदोलनाची आगामी दिशा मात्र स्पष्ट केली नाही.

बँकांच्या सोमवारच्या निर्णयावर निर्भर कर्मचाऱ्यांची भूमिकाही मंगळवारी स्पष्ट होईल.

आंतरराष्ट्रीय उड्डाणे शुक्रवापर्यंत ठप्पच

कर्मचाऱ्यांचे वेतन देऊ न शकणाऱ्या जेट एअरवेजची ठप्प असलेली आंतरराष्ट्रीय उड्डाणे शुक्रवापर्यंत (१९ एप्रिल) कायम राहतील. कंपनीने यापूर्वी सोमवापर्यंतच हा तिढा असेल, असे म्हटले होते. ठप्प आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा कंपनीने सलग तिसऱ्यांदा विस्तार केला आहे.

कर्मचाऱ्यांचे पंतप्रधानांना आवाहन

कर्जसंकटातील जेट एअरवेजच्या २०,००० जणांचे रोजगार वाचवावे, असे भावनिक आवाहन कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी केले. पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात, नरेंद्र मोदी यांनी स्वत: लक्ष घालून हा तिढा सोडवावा, असे ‘नॅशनल एव्हिएटर्स गिल्ड’ (नाग) ने म्हटले आहे.