चार महिन्यांत १२ टक्क्यांची भर

अमेरिकेसारख्या प्रमुख बाजारपेठेत भारतीय आभूषण व रत्नांना असलेली मागणी गेल्या चार महिन्यांत वाढली आहे. एप्रिल ते जुलै २०१६ दरम्यान ही मागणी ११.७ टक्क्यांनी वाढून ११.४ अब्ज डॉलर झाली आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत, एप्रिल ते जुलै २०१५ मध्ये या मौल्यवान वस्तूंची निर्यात १०.२१ अब्ज डॉलर होती.

‘रत्ने व दागिने निर्यात प्रोत्साहन परिषदे’ने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेतील बाजारपेठेत विशेषत: भारतात पॉलिश केलेल्या हिऱ्यांची मागणी वाढली आहे. ती वर्षभरापूर्वीच्या ६.८९ अब्ज डॉलरवरून यंदा ७.२५ अब्ज डॉलर झाली आहे, तर चांदीची निर्यात ५१ टक्क्यांनी वाढत १.३० अब्ज डॉलर झाली आहे. एप्रिल ते जुलै या चार महिन्यांतील ही कामगिरी आहे. देशाच्या एकूण निर्यातीत रत्ने व दागिने क्षेत्र हे १४ टक्के हिस्सा राखते.

सोने निर्यात मात्र यंदा तब्बल २५.१३ टक्क्यांनी घटली आहे. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या चार महिन्यांमध्ये ती वर्षभरापूर्वीच्या १.३६ अब्ज डॉलरवरून १ अब्ज डॉलपर्यंत घसरली आहे. सुवर्ण पदके तसेच नाण्यांची निर्यातही ९.५१ टक्क्यांनी कमी होत १.४८ अब्ज डॉलर झाली आहे.

सरकारने लागू केलेल्या ३ टक्के व्याजदर अनुदानामुळे निर्यातीला प्रोत्साहन मिळत असल्याचे परिषदेने म्हटले आहे. तयार वस्तूंच्या निर्यातीत सलग १८ महिने वाढ नोंदविल्यानंतर जुलै २०१६ मध्ये भारताची निर्यात ६.८४ टक्क्यांनी घसरली होती. प्रामुख्याने अभियांत्रिकी वस्तू व पेट्रोलियम उत्पादनांना असलेल्या कमी मागणीमुळेनिर्यातीत घसरण दिसली.