गुंतवणूकदारांची रक्कम थकविल्याप्रकरणी गेल्या पंधरवडय़ापासून अटकेत असलेल्या एनएसईएल या बाजारमंचाचे जिग्नेश शहा व श्रीकांत जवळगेकर यांना ३१ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. दरम्यान, ५,६०० कोटी रुपयांच्या एनएसईएल घोटाळा प्रकरणात उभयतांच्या जामिनावर येत्या गुरुवारी सुनावणी होणार आहे. शहा यांनी न्यायालयाला स्वतंत्र कक्षात ठेवण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात एमसीएक्सचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अंजनी सिन्हा हे सध्या जामिनावर बाहेर आहेत. शहा व सिन्हा यांनी या घोटाळ्यासाठी एकमेकांना जबाबदार धरले आहे. एनएसईएल बाजारमंचाशी संबंधित १८ हजार गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम वेळापत्रक आखूनही मिळालेली नाही. या प्रकरणाची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाद्वारे झाल्यानंतर सुरुवातीला सिन्हा व नंतर शहा यांना अटक करण्यात आली होती.