व्होडाफोन-आयडिया, एअरटेलधारक रोडावले

नवी दिल्ली : रिलायन्स जिओ सेवेच्या मोबाइल ग्राहकांची संख्या यंदाच्या जुलैमध्ये ८५.३९ लाखांनी वाढली आहे. ३३.९७ कोटी ग्राहकसंख्येसह जिओ अव्वल स्थानी आहे.

स्पर्धक व्होडाफोन-आयडिया तसेच एअरटेलला यंदा ग्राहक संख्येत घसरणीचा फटका बसला आहे. दोघांनी मिळून ६० लाखांहून अधिक ग्राहक दोन महिन्यांपूर्वी गमावले आहेत.

व्होडाफोन-आयडियाची ग्राहकसंख्या ३३.९ लाखांनी कमी होऊन एकूण ३८ कोटींवर तर एअरटेलचे ग्राहक २५.८ लाखांनी रोडावत एकूण ३२.८५ कोटींवर आली आहे.

भारतातील एकूण दूरसंचार सेवेच्या ग्राहकांची संख्या मासिक तुलनेत वाढून जुलैमध्ये ११८.९० कोटी झाली आहे. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात अपयश आलेल्या भारत संचार निगम लिमिटेडचे ग्राहक जुलै २०१९ मध्ये २.८८ लाखांनी वाढले आहेत. या सरकारी दूरसंचार कंपनीची एकूण ग्राहकसंख्या आता ११.६ कोटी झाली आहे.

यंदाच्या जुलैमध्ये देशातील शहरी भागातील दूरसंचार ग्राहकांची संख्या ६७.८ कोटी तर ग्रामीण भागातील ग्राहकांची संख्या ५१.१ कोटी नोंदली गेली आहे. ब्रॉडबँड सेवा ग्राहकांची संख्या महिन्याभरात १.६० टक्क्यांनी वाढून जुलैमध्ये ६०.४ कोटी झाली आहे.