जग्वार लँड रोव्हर (जेएलआर) इंडियाने सरलेल्या २०१७ वर्षांत ४९ टक्कय़ांची वाढ साधल्याची घोषणा शुक्रवारी केली. जानेवारी ते डिसेंबर २०१७ या वर्षांत तब्बल ३,९५४ गाडय़ांची विक्री करण्यात आली

जेएलआर इंडियाने ही दमदार कामगिरी आपल्या सर्व वाहनांच्या श्रेणीवर नव्या आणि स्पर्धात्मक किमती ठेवल्या तसेच जागतिक दर्जाच्या सेवांमुळे शक्य झाल्याचे म्हटले आहे. जेएलआरची एक्सई ही कार ३५.८५ लाख रुपयांना उपलब्ध असून त्यानंतर एक्सएफ, एफ-पेस, डिस्कव्हरी स्पोर्ट आणि रेंज रोव्हर इव्होक या सर्व मॉडेल ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरल्या आहेत. ऑल-न्यू डिस्कव्हरी या गाडीलाही ग्राहकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला, त्याचबरोबर आघाडीची रेंज रोव्हर स्पोर्ट आणि लँड रोव्हर ब्रँडची प्रमुख कार असलेल्या रेंज रोव्हरलाही ग्राहकांनी पसंती दर्शवली. जेएलआर इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रोहित सुरी यांनी २०१८ मध्येही आपल्या वाढीचा दर असाच बहरत जाईल अशी आशा व्यक्त केली आहे. नववर्षांत काही आकर्षक आणि नवीन उत्पादने भारतीय बाजारपेठेत दाखल केली जाणार असल्याचे नमूद करतानाच, चालू महिन्यात नवी रेंज रोव्हर वेलार ही कार प्रस्तुत केली जाणार असल्याचीही माहिती त्यांनी  दिली.