तेलाचा अंश आणि पोषणमूल्य अधिक असलेल्या, कोणताही जनुकीय बदल न केलेल्या (नॉन जीएम) अशा उच्च उत्पन्न देणाऱ्या सोयाबीनच्या बियाणांचे संशोधन, निर्मिती, विपणन व वितरणाच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण सामंजस्य तीन राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये अलीकडेच झाले.
खाद्यतेल क्षेत्रातील आघाडीची रुची सोया इंडस्ट्रीज लिमिटेडने कॅनडातील सोयाबीन संशोधन संस्था आणि सवरेत्कृष्टता केंद्र म्हणून मान्यता पावलेल्या डी. जे. हेन्ड्रिक इंटरनॅशनल इन्क (डीजेएचआयआय) आणि सोयाबीन व्यापार व विपणनातील जपानी कंपनी केएमडीआय इंटरनॅशनल या कंपन्यांबरोबर याकामी संयुक्त भागीदारी उपक्रमाची घोषणा केली आहे. या संयुक्त भागीदारीत रुची सोयाचा वाटा ५५ टक्के, डीजेएचआयआयचा वाटा ३५ टक्के, तर केएमडीआय इंटरनॅशनलचा उर्वरित १० टक्के सहभाग राहणार आहे. कुपोषणाशी दोन हात करीत असलेल्या भारतात, भरपूर पोषणमूल्ये व अन्न सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सोयाबीन उत्पादनाने जागतिक पातळीवर नीचांक गाठलेला आहे. उत्पादन जागतिक सरासरीहून कमी स्तरावर पोहचले आहे. म्हणूनच या संयुक्त उपक्रमातील प्रत्येक भागीदाराने आपापली बलस्थाने व तज्ज्ञतेचा वापर करून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करण्याची कटिबद्धता व्यक्त केली असल्याचे, रुची सोयाचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक दिनेश शाहरा यांनी सांगितले.
भारतात दरसाल १२ दशलक्ष टन सोयाबीनचे पीक घेतले जाते, जे जागतिक स्तरावर पाचव्या क्रमांकाचे उत्पादन ठरते. परंतु भारतात प्रति हेक्टरी उत्पादकता ही अडीच टनाच्या जागतिक सरासरीच्या तुलनेत निम्म्याहून कमी म्हणजे १.०१७ मेट्रिक टन इतकीच आहे. भारतात उत्पादित पिकातून दरसाल १.८ दशलक्ष टन सोयाबीन तेलाची निर्मिती होते, तर सोयाबीन तेलाची भारतात दरसाल जवळपास १.२ दशलक्ष टन आयात केली जाते.