जेपी मोर्गन म्युच्युअल फंडाने आपल्या जेपी मॉर्गन ट्रेझरी फंड व जेपी मॉर्गन शोर्ट टर्म फंड या दोन योजनांची फेरखरेदी बंद केल्याने वैयक्तिक गुंतवणूकदारांचे हाल झाले आहेत. परंतु ही फेरखरेदी बंद होण्यापूर्वी पाच संस्थात्मक गुंतवणूकदारांना आपले पसे काढून घेण्याची मुभा दिल्याची चर्चा म्युच्युअल फंड उद्योगाच्या वर्तुळात रंगली आहे.
‘लोकसत्ता’ने या प्रकरणी फंड घराण्याला व फंड घराण्याचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या जनसंपर्क कंपनीला इमेल पाठविला असता ते वृत्त देईपर्यंत अनुत्तरित राहिले. या घटनेवर लक्ष ठेऊन असलेल्या सूत्रांनुसार २६ ऑगस्ट रोजी या दोन योजनांची फेरखरेदी बंद झाली. २७ व २८ ऑगस्ट या दोन्ही फंडातून पाच मोठय़ा गुंतवणूकदारांनी रक्कम काढून घेतली. फंड घराण्याच्या या पक्षपाती धोरणाविरुद्ध अन्य मोठे गुंतवणुकदारांकडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते.
अ‍ॅम्टेक ऑटो या वाहन उद्योगासाठी पूरक उत्पादने तयार करणाऱ्या कंपनीच्या कर्ज व अन्य रोख्यांची केअर या पतमापन संस्थेने पत काढून घेतल्यापासून या प्रश्नाला सुरवात झाल्याचे मानले जाते. ७ ऑगस्ट २०१५ पासून केअर या पतमापन संस्थेने ४,००० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या अ‍ॅम्टेक ऑटो या कंपनीने घेतलेले ७,६४३ कोटींचे कर्ज व १,८२० कोटींचे अल्प मुदतीचे रोखे यांची पत स्थगित केल्याचे परिपत्रक काढले आहे.
जेपी मोर्गन म्युच्युअल फंडाने आपल्या निरनिराळ्या योजनांद्वारे २०० कोटी या कंपन्यांच्या रोख्यात गुंतवणूक केली होती. मागील आठवडय़ात फंडघराण्याने या दोन योजनांची फेरखरेदी थांबवल्याने अनेक गुंतवणूकदारांचा आपली गुंतवणूक काढून घेण्याचा मार्ग बंद झाला आहे. ही फेर खरेदी थांबवण्यापूर्वी पाच मोठय़ा गुंतवणूकदारांना फंड घराण्याने आपली रक्कम काढून घेण्यास उद्युक्त केल्याची चर्चा म्युच्युअल फंड उद्योगात सध्या रंगली आहे. या प्रकरणामुळे अन्य मोठे गुंतवणुकदार या फंड घराण्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत आहेत.
या निमित्ताने म्युच्युल फंडांच्या स्थिर उत्पन्न देणाऱ्या योजने बाबतीतला एक जुना मुद्दा या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे. केवळ जेपी मोर्गनच नव्हे तर अन्य १५ फंड घराण्यांनी ‘एए’ पत असलेल्या अ‍ॅम्टेक ऑटोसारख्या अन्य रोख्यांच्यात गुंतवणूक केली आहे. आयडीएफसी म्युच्युअल फंड व एसबीआय म्युच्युअल फंड या दोन फंड घराण्यांनी आपली गुंतवणूक ‘एए’ व ‘ए वन प्लस’ या सर्वोच्च पतधारण करणाऱ्या व्यतिरिक्त अन्य गुंतवणूक मर्यादित ठेवली आहेत. फ्रॅनकलिन टेम्पलटन या फंड घराण्याने आपल्या स्थिर उत्पन्न देणाऱ्या योजनांचा मोठा निधी सर्वोच्च पतधारण करणाऱ्या व्यतिरिक्त रोख्यात गुंतविला आहे.