बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित झोमॅटोचे भांडवली बाजारातील पदार्पण दमदार राहिले. कंपनीने निश्चित केलेल्या कमाल ७६ रुपये प्रति समभागाच्या तुलनेत ६६ टक्के अधिक प्रतिसादासह झोमॅटोची सूचिबद्धता झाली. शुक्रवारी भांडवली बाजारात धडक देणारा कंपनी समभाग सत्राच्या प्रारंभाला ११५ रुपयांवर होता. व्यवहारात तो १३८ रुपयांपर्यंत गेला. तर बंदअखेर तो १२५.८५ वर स्थिरावला. हा त्याचा मुंबई शेअर बाजारातील प्रवास होता. तर राष्ट्रीय शेअर बाजारात तो ११६ रुपयांपासून १२५.३० रुपयांपर्यंत राहिला. तेथे त्यातील वाढ ६५ टक्के राहिली. परिणामी कंपनीचे बाजार भांडवल एक लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. ‘आयपीओ’ दरम्यानही झोमॅटोला गुंतवणूकदारांचा उत्तम प्रतिसाद नोंदणीसाठी लाभला होता.

झोमॅटोच्या रूपात वर्ष २०२१ सुरू झाल्यापासून २० व्या कंपनीची प्राथमिक समभाग विक्री प्रक्रिया पार पडली आहे. तर मार्च २०२० नंतरचा तो सर्वात मोठा ‘आयपीओ’ ठरला आहे. जॅक माची अ‍ॅन्ट आणि अलिबाबा कंपन्यांचे अर्थपाठबळ असलेल्या नव उद्यमी-तंत्रस्नेही मंच कंपन्या भारतात आहे. मात्र येथील भांडवली बाजारात पदार्पण करणारी झोमॅटो ही त्यांची पहिली कंपनी ठरली आहे.