बाजार निर्देशांकांनी सार्वकालिक उच्चांक गाठूनही याचे प्रतिबिंब म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीत दिसत नाही. नव्याने गुंतवणूक करू लागलेल्यांच्या गुंतवणुकीवरील परतावा बँक मुदत ठेवींपेक्षा कमी आहे या मागील कारणांचे विश्लेषण, त्याचप्रमाणे म्युच्युअल फंड वितरण क्षेत्रात ‘पेटीएम’च्या प्रवेशाचे परिणाम या विषयी एल अँड टी म्युच्युअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि या उद्योग क्षेत्राची संघटना अर्थात ‘अ‍ॅम्फी’चे उपाध्यक्ष कैलाश कुळकर्णी यांनी ‘लोकसत्ता’शी केलेल्या बातचीतून केले..

मुंबई : ’  मागील वर्षभरात ज्यांनी म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली त्यांच्या गुंतवणुकीवरील नफ्याची टक्केवारी बँकांच्या मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याज दराहून कमी आहे. जे गुंतवणूकदार पाच वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीपासून गुंतवणूक करीत आहेत त्यांच्या गुंतवणुकीवरील नफ्याची टक्केवारी फारशी उत्साहवर्धक नाही. असे का घडते आहे?

– सामान्यत: तुमची गुंतवणूक वित्तीय ध्येयाशी निगडित हवी. समभाग गुंतवणूक ही दीर्घकालीन वित्तीय ध्येय साध्य करण्याचे साधन आहे. ही दीर्घकालीन ध्येये साकारण्यासाठी पुरेशी गुंतवणूक करीत असल्यास वित्तीय ध्येये साध्य होतील किंवा ध्येयाच्या जवळ पोहोचणे शक्य असते. दरम्यानच्या कालावधीत गुंतवणुकीवरील नफ्याची टक्केवारी बाजारातील चढ-उतारानुसार कमी होण्याची शक्यता असते. जर तुम्ही तुमची गुंतवणूक साध्य ध्येयाशी निगडित न ठेवता साध्य कालावधीशी निगडित ठेवलीत तर गुंतवणुकीचा वृद्धीदर नक्कीच तुम्हाला चिंताग्रस्त करेल. अनेकदा गुंतवणूकदार दीर्घकालीन नफ्याची टक्केवारी बघून गुंतवणूक करतात, पण अल्पकाळासाठी कमी झालेला परताव्याचा दर पाहून आपल्या वित्तीय ध्येयांपासून दूर जातात. समभाग आणि समभागसंलग्न गुंतवणूक ही दीर्घ काळासाठी असते. तेव्हा सध्या समभागसंलग्न गुंतवणुकीवरील नफ्याची टक्केवारी कमी झाली तरी ज्यांची वित्तीय ध्येये दीर्घ कालावधीची आहेत, त्यांनी ‘एसआयपी’च्या माध्यमातून आपली गुंतवणूक सुरू ठेवणे म्हणजे त्यांच्या वित्तीय ध्येयासमीप जाण्यासाठी मार्गक्रमण करणे होय.

’  दीर्घकालीन वित्तीय ध्येये आणि जोखीम बाळगण्याची क्षमता असलेल्यांसाठी समभागसंलग्न फंडात गुंतवणूक करण्याचा तुमचा सल्ला योग्य आहे; परंतु ज्यांचा जोखीमांक कमी आहे आणि वित्तीय ध्येये नजीकच्या काळातील आहेत त्यांनी नेमके काय करावे?

– समभाग गुंतवणूक दीर्घ कालावधीसाठी असली तरी कुठल्याही काळात समभाग गुंतवणूक निर्धोक नसते. देशात आणि जगभरात घडणाऱ्या वेगवेगळ्या घटनांचा परिणाम गुंतवणूक मूल्यांवर होत असतो. वित्तीय ध्येये कमी कालावधीत साकारायची असतील तर गुंतवणुकीवरील परतावासुद्धा कमी असतो. नजीकच्या काळात रोखे गुंतवणूक करणारे डेट फंड किंवा इक्विटी सेव्हिंग्ज योजना किंवा पाच ते सात वर्षांसाठी डायनॅमिक असेट अलोकेशन फंडाच्या गुंतवणूक मूल्यांवर वेगवेगळ्या घटनांचा कमी परिणाम होतो. नजीकच्या काळातील वित्तीय ध्येये आणि जोखीम बाळगण्याची कमी क्षमता असलेल्यांनी या फंडाचा गुंतवणुकीसाठी नक्कीच विचार करावा. बाजार मूल्यांकन (पी/ई) वरच्या पातळीवर असताना डायनॅमिक असेट अलोकेशन फंडातून समभाग गुंतवणूक केवळ २० टक्के असते. यामुळे या गुंतवणुकीतील जोखीम आपोआपच कमी होते.

’  देयक प्रणाली पेटीएम आपल्या मंचावर ‘डायरेक्ट प्लान’ विनामोबदला उपलब्ध करून देणार आहे. यामुळे म्युच्युअल फंडाच्या पारंपरिक वितरकांवर परिणाम संभवतो काय?

– भारतीय गुंतवणूकदाराला कायम एखाद्या सल्लागाराची गरज भासत असते. हा सल्लागार एखाद्या बँक रिलेशनशिप मॅनेजर किंवा एखादा मित्र किंवा वितरकाच्या रूपात हवा असतो. सध्या पेटीएम सल्लागाराच्या भूमिकेत असेल किंवा कसे या बाबतीत स्पष्टता नाही. पेटीएम म्युच्युअल फंड वितरणात तंत्रज्ञानाचा मोठा वापर करणार हे तर स्पष्टच आहे. त्यामुळे वितरणाचा खर्च कमी होऊन म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांची संख्या घातांकी पद्धतीने वाढेल. पारंपरिक वितरकांना (आयएफए) पेटीएम स्पर्धक वाटावा, अशी स्थिती सध्या तरी नाही. आपल्या देशाचा आकार आणि आपली लोकसंख्या पाहता म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा परिघ विस्तारायला आणखी खूप मोठा वाव आहे आणि या सर्वव्यापी विस्तारासाठी वितरण प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर अपरिहार्यच ठरतो. परंपरागत म्युच्युअल फंड वितरकांनी बीएसई, एनएसई, एमएफयू यासारख्या मंचाचा वापर केला तर पेटीएमकडून निर्माण होणाऱ्या स्पर्धेची झळ त्यांना कमी करता येईल.