फोर्जिग क्षेत्रातील आघाडीच्या कल्याणी फोर्जने गैरवाहन क्षेत्रावरही लक्ष केंद्रित केले असून यासाठी कंपनीने उत्पादन व प्रकल्प अद्ययावतचे धोरण अनुसरले आहे. व्यवसाय विस्ताराच्या हेतूने कंपनीने येत्या वर्षभरात ५० कोटी रुपयांची गुंतवणूक तर पुढील पाच वर्षांत १,००० कोटी रुपयांच्या उलाढालीचे उद्दिष्ट राखले आहे.
कल्याणी फोर्ज ही सध्या वाहन क्षेत्रासाठी लागणाऱ्या विविध घटकांचे उत्पादन घेण्यात आघाडीवर आहे. मात्र कंपनी सध्या वेगाने वाढणाऱ्या पायाभूत सेवा, ऊर्जा निर्मिती, तेल व वायू क्षेत्रासाठी आवश्यक असणाऱ्या उत्पादनांच्या निर्मितीवर भर देत असल्याची माहिती कंपनीच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालिका रोहिणी कल्याणी यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
कंपनीचे पुणे परिसरात तीन प्रकल्प असून उत्पादन क्षमता विस्तारण्यासह अद्ययावत तंत्रज्ञानाचीही कास धरली जात असल्याचेही त्या म्हणाल्या. याअंतर्गतच कंपनी वर्षभरात ५० कोटी रुपयांची गुंतवणूक तसेच २०१८ पर्यंत १,००० कोटी रुपयांची उलाढाल पूर्ण करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
१९९५ मध्ये कल्याणी समूहात दाखल झालेल्या रोहिणी कल्याणी यांनी आपल्या पहिल्या पाच वर्षांच्या कालावधीत कंपनीची विक्री ४५ कोटी रुपयांवरून २७१ कोटी रुपयांवर नेली. कंपनी आता निर्यात क्षेत्रातील संधी जोपासत असून या दृष्टीने युरोप, अमेरिका देशांमध्ये व्यवसाय विस्तारण्याच्या प्रयत्नात आहे. विदेशातील आपल्या ग्राहकांसाठी कंपनी युरो ५, युरो ६ पर्यावरणपूरक वाहनांसाठीची उत्पादने तयार करते.
कंपनीच्या एकूण व्यवसायापैकी ३५ टक्के हिस्सा या भागातील असेल, असा आशावाद रोहिणी यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर सध्या २,५०० टन वजन  क्षमतेची उत्पादने तयार करणारी कल्याणी ६,००० टनापर्यंतच्या वजनाची उत्पादनेही सादर करेल, असेही त्या म्हणाल्या. येत्या दोन ते तीन वर्षांत तंत्रज्ञान तसेच उत्पादन अद्ययावता पूर्ण झाल्यानंतर व्यवसाय ताबा प्रक्रियेतही कंपनी सहभागी होईल, असा मनोदयही रोहिणी यांनी व्यक्त केला.

४के प्रक्षेपणासाठी ‘केएसएस’चे सोनी कॉर्पोरेशनशी सामंजस्य
मुंबई: डिजिटल माध्यम व मनोरंजन क्षेत्रातील कंपनी केएसएस लिमिटेडने (पूर्वाश्रमीची के सेरा सेरा) भारतात प्रथमच सिनेमा प्रक्षेपणाचे ४के तंत्रज्ञान हे सोनी कॉर्पोरेशनच्या सहयोगाने प्रस्तुत केले आहे. केएसएस आणि सोनी यांच्या या सामंजस्यातून येत्या काळात देशातील विविध मल्टिप्लेक्स सिनेगृहांमध्ये ४के तंत्रज्ञानावर बेतलेले प्रोजेक्टर्स (प्रक्षेपक) बसविले जाणार आहेत. भारतात सध्या बहुतांश सिनेगृहांमध्ये २के तंत्रज्ञानावरील प्रक्षेपक वापरात आहेत. त्या तुलनेत चार पटींनी अधिक चित्र सुस्पष्टता ४ के प्रक्षेपकांद्वारे सिनेमा प्रेक्षकांना अनुभवता येईल. केएसएस लिमिटेडच्या मुख्याधिकारी विनीता द्विवेदी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, आगामी २-३ वर्षांत या सामंजस्यातून देशभरातील सिनेगृहांतील ३,००० पडद्यांना कवेत घेतले जाण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट राखले आहे. प्रारंभिक २७० ४ के प्रोजेक्र्ट्स बसविण्यासाठी केएसएसने १५० कोटी रुपयांची गुंतवणूकही नियोजित केली आहे, अशी त्यांनी माहिती दिली.

सिंडिकेट बँकेतर्फे नवउद्योजिकांसाठी ‘सिंड-महिलाशक्ती’ कर्ज योजना
मुंबई : नवीन उद्योग उभारू पाहणाऱ्या तसेच चालू असलेल्या उद्योग-व्यापारात विस्तार करू पाहणाऱ्या स्त्री-उद्योजिकांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील सिंडिकेट बँकेने ‘सिंड-महिलाश्क्ती’ नावाची कर्ज योजना प्रस्तुत केली आहे. बँकेच्या नुकत्याच साजऱ्या झालेल्या ८९ व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित समारंभात बँकेचे कार्यकारी अध्यक्ष अंजनेय प्रसाद यांनी या नव्या उद्योजिका सबलीकरणाच्या योजनेची घोषणा केली.
सिंड-महिलाश्क्ती योजनेत सिंडिकेट बँकेने पाच कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज हे सवलतीच्या व्याजदरात उद्योजिकांना उपलब्ध केले आहे. यात १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बँकेच्या पायाभूत व्याजदराने (सध्या १०.२५%) उपलब्ध होईल. शिवाय महिला उद्योजिकांकडून त्यासाठी कोणतेही तारणही मागितले जाणार नाही. १० लाखांपेक्षा अधिक रकमेच्या कर्जावर व्याजदरात अन्य कर्ज प्रकारांच्या तुलनेत ०.२५ टक्के सवलत दिली जाईल. सिंड-महिलाश्क्तीअंतर्गत सादर होणाऱ्या कर्जाच्या अर्जावर प्रक्रिया शुल्कही संपूर्ण माफ करण्यात आले आहे.
‘हॅबिटॅट फॉर ह्य़ुमॅनिटी इंडिया’ एक लाख स्वच्छतागृहे बांधणार
मुंबई: केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मोहिमेला सक्रिय पाठिंबा दर्शवितानाच ‘हॅबिटॅट फॉर ह्य़ुमॅनिटी इंडिया’ने देशात येत्या वर्षभरात एक लाख स्वच्छतागृहे उभारण्याचा संकल्प सोडला आहे. समितीच्या अध्यक्षा राजश्री बिर्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाचे उद्घाटन झाले. भारतात २०१५पर्यंत एक लाख स्वच्छतागृहे बांधण्यासाठी पािठबा मिळवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.