फोर्जिग क्षेत्रातील जागतिक अग्रेसर कल्याणी समूहाने धातू क्षेत्रातील आपल्या अनुभवाच्या शिदोरीचा संरक्षण, विमान वाहतूक आणि अणुविज्ञानाच्या व्यवसायात पाऊल टाकून पुरेपूर फायदा घेण्याचा मानस स्पष्ट केला आहे. येत्या तीन वर्षांत विशेषत: संरक्षण यंत्रणा व उपकरणे विकसित करण्यासाठी समूहाकडून मोठी गुंतवणूकही केली जाणार आहे.
देशांतर्गत संरक्षण सिद्धता वाढविण्यासाठी संरक्षण दलासाठी लागणाऱ्या सामग्रीच्या निर्मितीत कल्याणी समूह आपला सहभाग वाढवेल, असे धोरण कल्याणी समूहाचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांनी गुरुवारी स्पष्ट केले. समूहाने अत्याधुनिक तोफा आणि सुरुंगसंरक्षित वाहनांच्या निर्मितीसाठी अलीकडेच इस्रायलच्या एलबिट सिस्टीम्स या कंपनीसोबत भागीदारी केली आहे, तर हवाई संरक्षण क्षेत्रात उपकरणे पुरविण्यासाठी स्वीडनच्या साब या कंपनीशीही सहकार्याचा करार केला आहे.
केंद्र सरकारने अलीकडेच संरक्षण क्षेत्रात सामग्रीच्या निर्मितीसाठी खासगी तसेच थेट विदेशी गुंतवणुकीला वाव देणाऱ्या धोरणाला मंजुरी दिली आहे.

नवी दिल्ली येथे झालेल्या डीफ-एक्स्पो १४ या प्रदर्शनात अत्याधुनिक आणि पूर्णपणे भारतात तयार करण्यात १३०-१५५ तोफ प्रणालीचे सादरीकरण कल्याणी समूहाचे अध्यक्ष बाबा कल्याणी आणि त्यांचे सुपुत्र भारत फोर्ज लि.चे उपाध्यक्ष व मुख्य तंत्रज्ञान अधिकारी अमित कल्याणी यांनी जातीने उपस्थिती दर्शवून केले.