|| अजय वाळिंबे

कन्साई नेरोलॅक पेंट्स लिमिटेड (बीएसई कोड – ५००१६५)

मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे सध्याचा काळ चांगले लार्ज कॅप खरेदी करण्याचा आहे. पोर्टफोलियो तयार करताना त्याचा समतोल राखण्यासाठी स्मॉल कॅप, मिड कॅप तसेच लार्ज कॅप शेअर्सचे योग्य प्रमाण राखणे आवश्यक असते. प्रत्येक गुंतवणूकदाराचा पोर्टफोलियो त्याच्या जोखीम क्षमतेवर अवलंबून असतो. मात्र तरीही योग्य द्रवणीयता आणि अशा बेभरवशाच्या काळात लार्ज कॅप शेअर्सच तुम्हाला तारू शकतात. म्हणून पोर्टफोलियोच्या किमान ५० टक्के मूल्याचे शेअर्स लार्ज कॅप असावेत.

आज सुचविलेली कन्साई नेरोलॅक पेंट्स ही जपानच्या कन्साई पेंट लिमिटेड या कंपनीची उपकंपनी असून ती रंगकाम उद्योगातील भारतातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी कंपनी आणि औद्योगिक क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी आहे. नेरोलॅक पेंट्स मुख्यत्वे डेकोरेटिव्ह पेंट्सचे उत्पादन करते तसेच औद्योगिक क्षेत्राला आवश्यक असलेल्या इंडस्ट्रियल कोटिंग्जचेदेखील उत्पादन करते. भारतामध्ये कंपनीची महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, हरयाणा आणि तमिळनाडू येथे उत्पादन केंद्रे असून वाढत्या मागणीसाठी कंपनी आपली उत्पादन क्षमता वाढवत आहे. गुजरातमधील प्रकल्प नुकताच कार्यान्वित झाला आहे. नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका येथेही कंपनीचे प्रकल्प आहेत. रंगकाम उद्योगात भक्कम पाय रोवलेल्या या कंपनीचे नेरोलॅक, ग्लोसोलाइट, गूडी, एक्सेल आणि ऑलस्केप्स हे प्रमुख ब्रॅण्ड आहेत. पावडर कोटिंगमधील आपली आघाडी कायम राखण्यासाठी कंपनीने यंदा मारपोल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी ताब्यात घेतली. उत्पादनाच्या वाढत्या मागणीनुसार कंपनीने आपल्या उत्पादन क्षमतेत आगामी कालावधीत वाढ करण्याचा संकल्प केला आहे. गेल्या आर्थिक वर्षांत कंपनीची उत्पादन क्षमता ४,३१,००० मेट्रिक टन होती, ती यंदाच्या आर्थिक वर्षांत ४,६७,०००, तर २०२०पर्यंत ५,२७,००० मेट्रिक टनावर जाईल.

गेल्या आर्थिक वर्षांत तसेच यंदाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीकडून विशेष कामगिरी झालेली नाही. जून २०१८ साठी संपलेल्या पहिल्या तिमाहीसाठी कंपनीने १,३६६.९९ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १३९.८४ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. सतत वाढणाऱ्या कच्च्या तेलाच्या किमती ही रंगकाम उद्योगासाठी चिंतेची बाब असली तरीही कंपनीने आता तिच्या उत्पादनांच्या किमतीत केलेली वाढ आणि बहुविध उद्योगांना पूरक असणारी कंपनीची उत्पादने आणि ती मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनीने वाढवलेली उत्पादन क्षमता तसेच रंग उद्योगावरचा कमी झालेला वस्तू आणि सेवा कर या सर्वाचा सकारात्मक परिणाम आगामी कालावधीत कंपनीच्या कामगिरीवर होईल अशी आशा आहे. दीर्घकालीन मुदतीसाठी नेरोलॅक पेंटसारख्या कंपनीचा शेअर तुमच्या पोर्टफोलियोला झळाळी आणेल यात शंका नाही.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.