अस्थिरतेनंतर भांडवली बाजाराची तेजीसह अखेर

सोमवारी अर्थमंत्री अरुण जेटली संसदेत अर्थसंकल्प सादर करतील, तेव्हा वर बाजार कशी प्रतिक्रिया नोंदवितो याकडे गुंतवणूकदारांचे आता लक्ष..

आर्थिक पाहणी अहवालातील निरीक्षणावर नव्या महिन्याच्या वायदापूर्तीच्या पहिल्या दिवशी दोलायमान प्रतिक्रिया देणाऱ्या भांडवली बाजाराची अखेर मात्र तेजीसह झाली. सोमवारच्या अर्थसंकल्पापूर्वीचा अंदाज देणाऱ्या आर्थिक पाहणी अहवालात पुढील आर्थिक वर्षांसाठी देशाच्या विकास दराबाबत आशावाद व्यक्त केल्याने सेन्सेक्स व निफ्टी शुक्रवारी पुन्हा त्यांच्या अनोख्या टप्प्यावर स्वार झाले.

सेन्सेक्स १७८.३० अंश वाढीमुळे २३ हजाराच्या पुढे, २३१५४.३० वर तर ५९.१५ अंश भर पडल्याने राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीला त्याचा ७ हजारापुढील स्तर, ७,०२९.७५ पर्यंत गाठता आला. सुरुवातीच्या घसरणीनंतर बाजारात गुंतवणूकदारांनी व्यवहार करताना अखेपर्यंत नफेखोरीचा अवलंब केला.

संसदेत चालू आर्थिक वर्षांचा आर्थिक पाहणी अहवाल सादर होण्यापूर्वी सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्स २३,१४१.०८ या वरच्या टप्प्यावर सुरू झाला. मात्र दुपारच्या सत्रात त्याने २३,०२१.९४ या दिवसाचा तळही गाठला. सप्ताहाचा शेवट तेजीसह करण्यापूर्वी मुंबई निर्देशांक व्यवहारात २३,२२७.९१ पर्यंत पोहोचला होता. आर्थिक पाहणी अहवालात २०१६-१७ करिता विकास दर ७ ते ७.७५ टक्के अंदाजित केला गेला आहे.

एप्रिल ते नोव्हेंबर २०१५ दरम्यान देशातील थेट विदेशी गुंतवणूक ३१ टक्क्य़ांनी वाढल्याचे सर्वेक्षणातील निरीक्षणानेही बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. ही गुंतवणूक या दरम्यान २४.८ अब्ज डॉलर झाली आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारातून गुंतवणूक काढून घेण्याच्या धोरणामुळे जानेवारी २०१६ पासून सेन्सेक्स १२ टक्क्य़ांनी घसरला आहे.

शुक्रवारी सेन्सेक्समधील ३० पैकी ११ – कोल इंडिया, स्टेट बँक, एनटीपीसी, एल अ‍ॅन्ड टी, अ‍ॅक्सिस बँक, आयटीसी, एचडीएफसी बँक, टाटा मोटर्स, एचडीएफसी, सिप्ला, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्रू, इन्फोसिस, अदानी पोर्ट्स, आयसीआयसीआय बँक भेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्थान यूनिलिव्हर यांचे समभाग मूल्य वाढले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये पोलाद निर्देशांक सर्वाधिक १.६६ टक्क्य़ांसह वाढला.

साप्ताहिक तुलनेत मात्र सेन्सेक्सने ५५४.८५ अंश तर निफ्टीने १८१ अंश घसरण नोंदविली आहे. सोमवारी अर्थमंत्री अरुण जेटली संसदेत अर्थसंकल्प सादर करतील, तेव्हा वर बाजार कशी प्रतिक्रिया नोंदवितो याकडे गुंतवणूकदारांचे आता लक्ष आहे.