गुंतवणूकदार वर्गात ‘मिडकॅप गुरू’ या बिरुदाने ओळखले जाणारे व आयडीएफसी म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी केनेथ आंद्रादे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आयडीएफसी म्युच्युअल फंडाच्या ५२,००० कोटींच्या एकूण मालमत्तेपकी ८,००० कोटींच्या समभागसंलग्न गुंतवणूक योजनांचे व्यवस्थापन पाहणारे केनेथ आंद्रादे यांचा गुंतवणूकदारांना भरघोस परतावा देणाऱ्या मिडकॅप धाटणीच्या सुप्त पण बहुप्रसवा समभागांच्या निवडीचा हातखंडा खासच चर्चित राहिला आहे.
केनेथ यांच्या राजीनाम्याचे कारण स्पष्ट नसले तरी देशातील एकूणच म्युच्युअल फंडांच्या कामकाज पद्धतीतून येणारा व्यावसायिक ताण हेच त्याचे मूळ असल्याचे सांगितले जात आहे. म्युच्युअल फंडांमार्फत गुंतवणूकदारांनी दीर्घकालीन आणि ‘एसआयपी’ धाटणीची नियमित गुंतवणूक शिस्त पाळून संपत्तीची निर्मिती करावी असे प्रबोधन केले जाते. तरीही निधी व्यवस्थापकाच्या कामगिरीचे मूल्यमापन करताना, मात्र त्याच्या फंडाने प्रत्यक्षात प्रत्येक महिन्यागणिक दिलेल्या परताव्याचा दर हा अल्पकालिक निकष आधारभूत मानला जातो.
‘‘आज वीस वष्रे या क्षेत्रात असूनही रोज मध्यरात्री निव्वळ मालमत्ता मूल्य सांगणारा एसएमएस संदेश मन:शांती विचलित करतो. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी होणाऱ्या आढावा बठकीत हाच पहिला चच्रेचा मुद्दा असतो,’’ असे एका निधी व्यवस्थापकाने ‘लोकसत्ता’ला सांगितले.
केनेथ आंद्रादे यांनी राजीनामा दिल्याचे आयडीएफसी म्युच्युअल फंडानेही अधिकृतपणे मान्य केले असून सध्या ते नोटीस कालावधीत असल्याचे सांगितले. कंपनीच्या निवेदनाप्रमाणे त्यांनी म्युच्युअल फंड उद्योगालाच अलविदा केल्याचे स्पष्ट होते. या संबंधाने अधिकृतपणे पुष्टी मात्र होऊ शकलेली नाही.

मिडकॅप गुंतवणूक गुरू!
मार्च २०१३ मध्ये केनेथ यांच्या आधिपत्याखाली ‘आयडीएफसी इक्विटी अपॉच्र्युनिटी फंड सीरिज-१’ या नावाने सुरू झालेल्या योजनेने आजतागायत ११० टक्के लाभांशाचे वितरण केले आहे. तेच व्यवस्थापन पाहात असलेल्या ‘आयडीएफसी प्रीमियर इक्विटी’ या दुसऱ्या फंडाने १९.३३ टक्के चक्रवाढ दराने मागील सात वर्षांत परतावा दिला आहे. याच कालावधीत ‘एस अँड पी बीएसई ५००’ या संदर्भ निर्देशांकाच्या वाढीचा दर केवळ ८ टक्के इतका आहे. याच फंडाने केनेथ आंद्रादे यांना ‘मिडकॅप गुरू’ हे बिरुद मिळवून दिले.