संपूर्ण देशी तंत्रज्ञान वापरून देशात पहिल्यांदा ‘नेक्स्टजेन स्टीम टर्बाइन’ बनविण्याचा मान किलरेस्करवाडीच्या ‘केईपीएल कंपनी’ला मिळाला आहे. हा तयार केलेला पहिला टर्बाइन इंडोनेशियाला लवकरच रवाना होणार आहे. या टर्बाइनचा वापर पेट्रोलियम व गॅस कंपनीमध्ये केला जाणार असल्याचे कंपनीचे कार्यकारी संचालक श्रीवास्तव यांनी सांगितले.
भारतात अद्याप संपूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञान वापरून अशा प्रकारच्या ‘नेक्स्टजेन स्टीम टर्बाइन’चे उत्पादन कुठल्या कंपनीकडून करण्यात आलेले नाही. याबाबत ‘केईपीएल कंपनी’ने गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू केले होते. याअंतर्गत कंपनीला या वर्षी यश आले असून तयार झालेले हे ‘टर्बाइन’ इंडोनेशियाला रवाना होत आहे.
किलरेस्कर ब्रदर्सच्या या कंपनीमध्ये सध्या वर्षांला १०० टर्बाइन तयार करण्यात येणार असून, त्याची निर्मिती जागतिक दर्जाच्या ‘एपीआय’ मानकानुसार करण्यात येत आहे. यामुळे जागतिक पातळीवरील यंत्रनिर्मितीतील अन्य उद्योगांमध्ये ही कंपनी स्पर्धक झाली आहे. सध्या जगात केवळ चार कंपन्याच अशा प्रकारच्या टर्बाइनची निर्मिती करीत आहेत. यामुळे ‘केईपीएल’चे हे यश खूप मोठे मानले जात आहे.
केईपीएल ही कंपनी किलरेस्कर ब्रदर्स समूहाचा एक भाग असून, अभियांत्रिकी क्षेत्रात स्थानिक पातळीवरील तंत्रज्ञान विकसित केले जाते. या कंपनीकडून गुंतागुंतीचे पंप आणि संबंधित उत्पादनेही तयार केली जातात. त्याचा वापर हायड्रोकार्बन प्रक्रियेमध्ये तेल आणि वायू, खते, रसायन उद्योग पाणी प्रक्रिया प्रकल्प व ऊर्जा प्रकल्प यांच्यातील महत्त्वाच्या वापरासाठी प्रामुख्याने केला जातो.