बऱ्याच प्रतीक्षेनंतर, कियाने ६.७१ लाख रुपयांच्या प्रारंभिक किमतीला भारतात ‘सोनेट’ हे तिचे पहिले छोटेखानी एसयूव्ही श्रेणीतील वाहन शुक्रवारी बाजारात आणले. या अनावरणाचे वैशिष्टय़ म्हणजे जागतिक बाजारपेठेसाठी विकसित हे किया मोटर्स इंडियाचे भारतातच घडविलेले वाहन आहे.

छोटेखानी अर्थात कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणीत पहिले डिझेलवरील सिक्स-स्पीड स्वयंचलित आणि बुद्धिमान मॅन्युअल ट्रान्समिशनचा (आयएमटी) अंतर्भाव हे सोनेटचे वैशिष्टय़ आहे. या शिवाय अनेक वैशिष्टय़पूर्ण गोष्टी जसे १०.२५ इंच असे या श्रेणीतील सर्वात मोठे एचडी टचस्क्रीन दिशादर्शन आणि रस्त्यावरील रहदारीची अद्ययावत माहिती देणारी प्रणाली, बोसची सात ध्वनिवर्धकांचा समावेश असलेली प्रणाली. एलईडी साऊंड मूड लाइट्स, हवेशीर आणि ऐसपैस आसन रचना (३९२ लिटरचे बूट स्पेस), वायरलेस स्मार्टफोन चार्जरसह कूलिंग फंक्शन आणि सुरक्षिततेसाठी सहा एअरबॅग्ज यात आहेत.

कंपनीने आतापर्यंत सोनेटसाठी २५,००० हून अधिक बुकिंग्जद्वारे उत्साहवर्धक मागणी नोंदविली आहे, अशी किया मोटर्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी कूखयून शिम यांनी माहिती दिली. सोनेटची निर्मिती आंध्रप्रदेशमधील अनंतपूर येथील कंपनीच्या अत्याधुनिक उत्पादन केंद्रातून करण्यात आली आहे. वार्षिक ३,००,००० उत्पादन क्षमतेमुळे भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय ग्राहकांकडून सोनेटसाठी येणाऱ्या वाढत्या मागणीची यातून सुलभपणे पूर्तता करता येईल, असा विश्वास शिम यांनी व्यक्त केला.