दुचाकी निर्मितीतील आघाडीच्या फिरोदिया समूहातील कायनेटिकने विजेरी ऑटो रिक्षा वाहनाची निर्मिती सुरू केली असून गेल्याच आठवडय़ात ती देश स्तरावर सादर करण्यात आली. समूहाच्या कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्युशन्स लिमिटेडने लिथिअम आयन बॅटरीसह देशात पहिल्यांदाच तीन चाकी रिक्षा याद्वारे भारतीय वाहन बाजारपेठेत उतरवली आहे.

सध्याच्या विजेरी वाहनांमधील बॅटरीमध्ये आम्लयुक्त बॅटरींचा उपयोग केला जातो. कायनेटिकने मात्र वजनाने कमी, अधिक कालावधीकरिता बॅटरी सादर करताना संबंधित वाहनातील बॅटरी ही पर्यावरणपूरक असल्याचे कंपनीच्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुलज्जा फिरोदिया मोटवानी यांनी म्हटले आहे.

तूर्त हे तीन चाकी वाहन पहिल्या महिन्याभरासाठी प्रायोगिक तत्त्वावर असून पुढील कालावधीत ते देशातील सर्व प्रमुख वितरकांकडे उपलब्ध होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. लेड अ‍ॅसिडपेक्षा या वाहनातील लिथिअम आयन बॅटरी अधिक महाग असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

९० च्या दशकात देशातील पहिली गिअरलेस स्कूटर (होंडाच्या भागीदारीतून – कायनेटिक होंडा) तसेच स्पार्क दुचाकी सादर करणाऱ्या कायनेटिकने काही वर्षांपूर्वी आपला दुचाकी व्यवसाय महिंद्र समूहाला विकला. यानंतर कायनेटिक दुचाकी वाहन निर्मितीतून बाहेर पडली होती.