किंगफिशर एअरलाइन्सला बँकांनी दिलेल्या कर्जाच्या गैरवापराबाबत तपास सुरू असताना, हा कर्ज निधी विदेशातील व्यवहारासाठी वळता तर केला गेला नाही ना याबाबतची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) करणार आहे. यासाठी या तपास यंत्रणेने अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स तसेच हाँगकाँग येथील संबंधितांना पत्रे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

विजय मल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्सने सार्वजनिक त्रेत्रातील आयडीबीआय बँकेकडून ९५० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. पैकी काही रक्कम खासगी क्षेत्रातील अ‍ॅक्सिस बँकेच्या कंपनीच्या खात्यात वळविण्यात आली. कंपनीद्वारे विदेशातील व्यवहाराकरिता ती वापरल्याचा सीबीआयला संशय आहे.

थकीत कर्जाबद्दल आयडीबीआय बँकेच्या किंगफिशरविरुद्धचा खटला सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे.

तपास यंत्रणेला आंतरराष्ट्रीय तपास गटातर्फे प्रतिसाद मिळत असून एकूणच मल्या व किंगफिशरबाबतच्या साऱ्या प्रकरणाची माहिती या चार देशांकडून अधिकृतपणे मिळविण्यासाठी सीबीआयकडून लवकरच विनंतीवजा पत्रव्यवहार केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.