देशातील दुसऱ्या क्रमांकाची खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेचे तुम्ही खातेदार असाल, तर तुम्हाला बँकेकडे पुन्हा एकदा आपले निवासाचे आणि ओळखीचे पुरावे सादर करणे भाग ठरेल. बँकेकडून अशा आवाहनाचे ई-मेल व एसएमएस संदेश आपल्यापर्यंत येऊन धडकलेही असतील. बँकिंग प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण अशा ‘ग्राहकांना जाणून घेण्या’च्या अर्थात ‘नो यूअर कस्टमर (केवायसी)’ची प्रक्रिया दुसऱ्यांदा राबविण्याचा हा एचडीएफसी बँकेने सुरू केलेला प्रघात स्वागतार्हच असून, अन्य वाणिज्य बँकांकडून तो लवकरच अनुसरला जाण्याची शक्यता बँकिंग वर्तुळात व्यक्त होत आहे.
काळ्या पैशाचे पांढरे करण्यासाठी बँकिंग प्रणालीचा वापर झाल्याचा आरोप असलेल्या ‘कोब्रापोस्ट’ने भांडाफोड केलेल्या तीन बडय़ा खासगी बँकांपैकी एक असलेल्या एचडीएफसी बँकेने स्वयंप्रेरणेनेच ‘केवायसी’ प्रक्रिया आपल्या सर्व खातेदारांसाठी राबवून नवीन आदर्श निर्माण केला आहे. तथापि गेल्या काही वर्षांपासूनच ‘केवायसी’ पुनप्र्रक्रिया राबविण्याची बँकेला आवश्यकता भासत होती, अशी स्पष्टोक्ती एचडीएफसी बँकेचे कार्यकारी संचालक परेश सुकथनकर यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केली आणि बँकिंग नियंत्रकाकडून तशा प्रकारचा कोणताही दबाव आला नसल्याचा निर्वाळा दिला.
रिझव्‍‌र्ह बँकेने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ‘केवायसी’ दस्तावेज पुन्हा नव्याने सादर करणे अथवा अद्ययावत करणे ही एक नियमित प्रक्रिया असून, ते एकूण बँकिंग ग्राहकांच्या हिताचेच आहे, असे आयडीबीआय बँकेचे कार्यकारी संचालक आर. के. बन्सल यांनीही सूचित केले. त्यामुळे एचडीएफसी बँकेप्रमाणे अन्य वाणिज्य बँकांकडून फेर-केवायसी राबविली गेल्यास नवल ठरणार असेही त्यांनी सुचविले.
एचडीएफसी बँकेचे देशभरात २.६ कोटींहून अधिक खातेदार असून, त्या सर्वाना नजीकच्या शाखेत जाऊन ओळख पुरावा (पॅन कार्ड, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र यापैकी एक), एक छायाचित्र आणि निवासाचा पुरावा (पासपोर्ट, वीज-टेलिफोन देयके अथवा रेशन कार्ड) हे ‘री-केवायसी’ अर्जासह लवकरात लवकर सादर करण्यास सांगण्यात आले आहे.