नवी दिल्ली : भारतातील व्यवसाय- सुलभतेचे चित्र अधिक परिणामकारक ठरण्यासाठी देशातील कोलकाता आणि बंगळुरू शहरांचा समावेश याबाबतच्या पाहणीत करण्यात आला आहे. जागतिक बँकेचा २०२० साठीचा व्यवसायसुलभता क्रमवारीचा अहवाल गुरुवारीच जाहीर होण्याची शक्यता आहे.

भारताचे सुलभ व्यवसायासाठी पूरक असे मानांकन निश्चित करण्यासाठी जागतिक बँकेच्या पाहणीत या दोन शहरांचा समावेश करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या पाहणीत सध्या देशातील मुंबई, दिल्ली या शहरांचाच समावेश आहे.

जागतिक बँकेच्या याबाबतच्या अहवालात सध्या भारतासह १९० देशांचा समावेश आहे. व्यवसाय सुलभतेबाबत विविध १० निकषांच्या आधारे जागतिक बँक विविध देशांच्या कामगिरीनुरूप क्रमवारी निश्चित करत असते. यामध्ये पतपुरवठा, बांधकाम परवानगी, विजेची उपलब्धता, नादारी प्रक्रिया, कंत्राटे मिळविण्याची प्रक्रिया आदींचा अंतर्भाव आहे.

जागतिक बँकेच्या सुलभ व्यवसाय क्रमवारीत भारताचा सध्या ७७ वा क्रमांक आहे. सलग दुसऱ्या वर्षी देशाचे स्थान उंचावले आहे. नादारी व दिवाळखोरी संहिता, कर पद्धतीतील सुधारणा आदींची दखल त्यासाठी घेतली गेली. २०१८ च्या अहवालात भारताचा क्रम १००वा होता.

विविध १९० देशांमध्ये न्यूझीलंड, सिंगापूर, डेन्मार्क, हाँगकाँग, अमेरिका आदी अव्वल स्थानावर आहेत. शेजारील चीन सध्या सुलभ व्यवसाय क्रमवारीत ४६ व्या तर पाकिस्तान १३६ व्या स्थानावर आहे.