09 August 2020

News Flash

‘निफ्टीबीज, सरकारी कंपन्यांचे ईटीएफ गुंतवणूकयोग्य’

देशात बचतीचा दर एका समयी २३ टक्के होता, तो आता १७ टक्क्यांवर घरंगळलेला दिसत आहे,

कोटक सिक्युरिटीजचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि पीसीजी व्यवसायप्रमुख आशीष नंदा यांच्या आगामी वर्षांतील भांडवली बाजाराचा कल आणि गुंतवणूकदारांनी अनुसरायचे धोरण या संबंधाने झालेल्या वार्तालापाचा गोषवारा..

मावळत्या वर्षांचा पुनर्वेध घेतानाच, आगामी २०२० सालातील भांडवली बाजाराविषयी तुमचा दृष्टिकोन काय आहे?

उभारीला सुरुवात झाली आहे आणि २०२० सालात ती जोम पकडेल अशा उज्ज्वल आशा आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेतील मंदावलेपण खरे तर २०११ सालापासूनच सुरू झाले आहे. त्याबरहुकूम सरकार आणि रिझव्‍‌र्ह बँकेकडून अनेक मऊ-कठोर स्वरूपाच्या उपापयोजना तेव्हापासूनच सुरू झाल्या असल्याचेही लक्षात येईल. बँकांच्या ताळेबंदाच्या स्वच्छतेच्या तेव्हा सुरू झालेल्या प्रयत्नांच्या सुफलतेचे आणि वित्तीय व्यवस्थेत पुरेशी तरलता राखण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. येणाऱ्या काळात बँकांकडून व्याजदर कपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत पुरेपूर संक्रमित केला जाईल. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांतील सरकारच्या भागभांडवलाची निर्गुतवणूक ही वित्तीय तुटीत कपात अथवा नियंत्रणास मदतकारक ठरेल. स्थावर मालमत्ता, विशेषत: गृहनिर्माण क्षेत्रावर भर दिला जाणे अर्थव्यवस्थेच्या व्यापक उभारीसाठी सकारात्मक ठरेल. कंपनी करात कपातीतून स्पर्धात्मकतेला चालना मिळाली असून, थेट विदेशी गुंतवणूकही त्यातून आकर्षति होताना दिसेल. फेब्रुवारीतील अर्थसंकल्पातून प्राप्तिकराच्या दरातही कपात केली गेल्यास, अर्थव्यवस्थेतील मागणीला अपेक्षित चालना मिळेल. एकंदरीत आगामी वर्षांचे भविष्यवेधी चित्र हे अशा काही गोड घटना, घोषणांमध्ये गुंफलेले आहे. गुंतवणूकदारांमध्ये हा आशावाद खच्चून भरलेलाच आहे आणि याचे प्रत्यंतर बाजारात नवनवीन शिखर गाठत असलेले निर्देशांक देत आहेत.

सरत असलेल्या वर्षांचा वेध घेत असताना, काही नेमक्या गोष्टींचा उल्लेख क्रमप्राप्त ठरेल. भारतीय अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा त्यातून बदलणार आहे. यातील पहिली घटना म्हणजे, देशात पुढील पाच वर्षे राजकीय स्थिरता असेल असे सरकार केंद्रात स्थानापन्न झाले आहे. दुसरी, कंपनी करात कपातीची आहे. तिसरी, सलग पाच वेळा केली गेलेली व्याजदर कपात आणि तिचे सामान्य कर्जदारांपर्यंत आनुषंगिक संक्रमण. चौथी, सरकारी बँकांचे एकत्रीकरण आणि त्यांचे पुरेसे भांडवलीकरण आणि पाचवी घटना ही वाहनांच्या विक्रीला लागलेली घरघर थांबली असून, विक्रीतील नीचांकातून हे क्षेत्र डोके वर काढताना दिसत आहे.

सध्या बाजार आणि गुंतवणूकदारांनी दखल घ्यावी अशी कोणती प्रमुख आव्हाने तुम्हाला दिसून येतात?

बाजारात सध्या एक महत्त्वाचे विचार द्वंद्व सुरू आहे. विकास दराचे सध्याचे चित्र पाहायचे की भविष्याविषयी भाकितांना लक्षात घ्यावयाचे असे हे द्वंद्व आहे. विदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय हाही एक चिंतेचा विषय आहे. बँकेतर वित्तीय क्षेत्रातील रोकड तरलतेच्या चणचणीने, स्थावर मालमत्तेसारख्या अनेक उद्योग क्षेत्राची सुरू असलेली भांडवली उपासमार मोठा गहन विषय आहे. रोजगारप्रवण असलेल्या बांधकाम, स्थावर मालमत्ता आणि धातू क्षेत्रातून मोठय़ा प्रमाणात नोकरकपात घसरलेल्या ग्राहक मागणीत आणखीच भर टाकत आहे.

गेल्या काही वर्षांत खासगी तसेच सरकारी कंपन्यांकडून लक्षणीय असा भांडवली खर्चाच्या योजनाच आलेल्या नाहीत. जीडीपीत वाढ ही सेवा व वस्तूंच्या मागणीतील वाढीशी थेट जुळलेली असते. जर मागणीच नसेल तर उत्पादनही होणार नाही आणि भारताला अंदाजल्याप्रमाणे जीडीपी वाढीचा भविष्यातील दर सांभाळणे मग अवघड बनेल. देशात बचतीचा दर एका समयी २३ टक्के होता, तो आता १७ टक्क्यांवर घरंगळलेला दिसत आहे, हे निश्चितच सुचिन्ह नव्हे.

मग प्राप्त स्थितीत गुंतवणुकीच्या संधी कोणत्या?

भांडवली खर्च व गुंतवणूक वाढेल अशा काही दमदार घोषणांची सरकारकडून अपेक्षा आहे. पायाभूत सोयीसुविधांच्या विकासावर भर पुढेही सरकारकडून कायम राहील असे दिसते. हे पाहता, पायाभूत निर्माण, भांडवली वस्तू आणि वीज वितरण कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची संधी दिसून येते. सध्या अनेक नवीन स्मॉल व मिड कॅप म्युच्युअल फंड ‘एनएफओ’द्वारे बाजारात दाखल होत आहेत. हा या क्षेत्रातील चांगल्या समभागांमध्ये गुंतवणूक करण्याचा संकेत समजला गेला पाहिजे. अत्यल्प कर्जभार आणि चांगला व्यवसाय असलेल्या मिड कॅप कंपन्या येणाऱ्या काळात जोमदार कामगिरी करतील.

बाजाराचे मूल्यांकन सध्या महागडे आहे म्हटले जाते, तुम्ही याकडे कसे पाहता?

मूल्यांकन सध्या वाजवीपेक्षा काहीसे उच्च निश्चितच आहे. अनेक आर्थिक आणि सरकारी घोषणा नजीकच्या काळात येऊ घातल्या आहेत त्याबद्दलचा आशावाद हेच यामागे कारण आहे. उद्योगधंद्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण सरकार करीत आहे, ज्याचे दूरगामी सुपरिणाम दिसतील. दुसऱ्या तिमाहीत कंपन्यांच्या सरासरी उत्पन्नवाढीबाबत १५ टक्क्यांचे आमचे अनुमान होते. फेरआढावा घेतल्यानंतर ही वाढ १०-११ टक्क्यांवर घसरेल असे आता लक्षात येते. अशा स्थितीत बाजाराचे मूल्यांकन अर्थात किंमत उत्पन्न (पी/ई) गुणोत्तर मग महागडे ठरते. सध्या ते १९ या पातळीवर आहे, परंतु कंपन्यांची उत्पन्न पातळी घसरल्यास ते २१ पर्यंत वाढलेले दिसेल. परिणामी बाजारात संस्थात्मक गुंतवणूकदारांवर विक्रीचा दबाव वाढेल. तिसऱ्या तिमाहीत मात्र मूल्यांकन ताळ्यावर आलेले दिसेल. सामान्य गुंतवणूकदारांनी आर्थिक वर्ष २०२१ साठी १६ ते १७ अशा स्वस्त मूल्यांकनाला लक्षात घेऊन, निर्धास्तपणे गुंतवणुकीचा निर्णय घ्यायला हरकत नाही.

आगामी तिमाहीसाठी निफ्टीची संभाव्य हालचाल कशी असेल?

चालू तिमाहीत कंपन्यांची वित्तीय कामगिरी बहुतांश अपेक्षेप्रमाणे आणि महसुली वाढीत सुधारणा दर्शविणारी राहिली. हे लक्षात घेता, निफ्टी निर्देशांकासाठी नीचतम स्तर ११.५०० आणि वरचा स्तर १२,६०० असा असेल असे मानता येईल. अगदी सहा वर्षांच्या नीचांक गाठणारी ४.५ टक्के जीडीपी वाढीची आकडेवारी जाहीर होऊनही निफ्टीने १२ हजारांची पातळी कायम राखल्याचे दिसले आहे. त्यामुळे आगामी तिमाहीतही ११,५०० ते १२,२०० या दरम्यान निफ्टी निर्देशांक राहण्याची अपेक्षा आहे.

सध्याच्या बाजार स्थितीत गुंतवणुकीचा आदर्श पोर्टफोलियो काय राहील?

निर्देशांकांनी शिखर पातळी गाठली आहे आणि आगामी कल सकारात्मक असल्याने, प्रत्येक घसरणीत निफ्टीबीजची खरेदी आणि ‘निफ्टी नेक्स्ट ५०’मधील दर्जेदार मिडकॅप समभागांची पोर्टफोलियोत भर घालण्याचे धोरण गुंतवणूकदारांना अनुसरता येईल. १२ ते १८ महिन्यांसाठी गुंतवणुकीचे उद्दिष्ट असणाऱ्या गुंतवणूकदारांना बँकबीज अथवा सरकारकडून जाहीर होणाऱ्या ईटीएफ फंडांचे युनिट्सही गोळा करता येतील. म्युच्युअल फंडाच्या गुंतवणूकदारांनी नामांकित फंड घराण्यांच्या वृद्धी योजनांमध्ये गुंतवणूक करावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2019 2:06 am

Web Title: kotak securitie executive vice president ashish nanda loksatta interview zws 70
Next Stories
1 गुंतवणूकदारांचा विक्री दबाव कायम
2 …तर व्होडाफोन, आयडिया व्यवसाय गुंडाळेल, बिर्ला यांचं मोठं विधान
3 रिझव्‍‌र्ह बँकेकडून अपेक्षित दर कपात नाहीच
Just Now!
X