नवी दिल्ली : आर्थिक चणचणीचा सामना करीत असलेली दूरसंचार कंपनी व्होडाफोन-आयडिया लि.चे बिगर कार्यकारी संचालक आणि बिगर कार्यकारी अध्यक्षपदाचा बुधवारी कुमार मंगलम बिर्ला यांनी राजीनामा दिला.

बुधवारी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीने बिर्ला यांचा राजीनामा स्वीकारला आणि त्यांच्या जागी आदित्य बिर्ला समूहाचे नवीन प्रतिनिधी आणि बिगर कार्यकारी अध्यक्ष म्हणून हिमांशू कपानिया यांची नियुक्तीही घोषित करण्यात आली. या क्षेत्रातील दांडगा अनुभव आणि कपानिया यांची २५ वर्षांची कारकीर्द राहिली आहे.

मक्तेदारीविरोधी सूर

भारतात दूरसंचार क्षेत्रात तीन वा अधिक खासगी स्पर्धकांची गरज असल्याचे नमूद करीत, भारती एअरटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाळ विठ्ठल यांनी बुधवारी विशिष्ट कंपनीच्या मक्तेदारीला पूरक नियमन हे दूरसंचार क्षेत्राला मारक ठरत असल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केले. सरकारकडून दिलासादायी उपायांची त्यांनी अपेक्षाही व्यक्त केली.