मुदत वाढविण्यास रिझव्‍‌र्ह बँकेचा नकार

पेटीएमसारख्या पेमेंट्स वॉलेटच्या ग्राहकांची ओळख पटविणारी ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत वाढविण्यास रिझव्‍‌र्ह बँकेने असमर्थता दर्शविली आहे. यामुळे पेमेंट्स वॉलेटना ‘केवायसी’ची पूर्तता करण्यासाठी केवळ बुधवारचा  शेवटचा दिवसच राहिला आहे.

मोबाइल पेमेंट वॉलेट असलेल्या माध्यमांना ‘तुमचा ग्राहक जाणून घ्या’ अर्थात ‘केवायसी’ची पूर्तता करणे रिझव्‍‌र्ह बँकेने बंधनकारक केले आहे. यानुसार पेमेंट वॉलेट कंपन्यांना २८ फेब्रुवारीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. ही मुदत वाढविली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली गेली होती. मात्र रिझव्‍‌र्ह बँकेने याबाबत मंगळवारी खुलासा करताना आता कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे स्पष्ट केले.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या स्पष्टीकरणामुळे आता भारतातील १२,००० कोटी रुपयांच्या पेमेंट्स वॉलेट व्यवसायात अनिश्चितता निर्माण झाली आहे. पेटीएम, मोबिक्वीक, ओला मनी, अ‍ॅमेझॉन पे, सोडेक्सोसारखे पेमेंट वॉलेट सध्या लोकप्रिय आहेत. भारतातील एकूण आर्थिक व्यवहारांपैकी सध्या या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांचे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत असल्याचे सांगितले जाते. सध्या बँकांनी प्रवर्तित केलेले ५० हून अधिक पेमेंट वॉलेट आहेत. तर याहून अधिक संख्येने बिगर बँक प्रीपेड पेमेंट साधने अस्तित्वात आहेत.

‘केवायसी’ची पूर्तता न करणाऱ्या वॉलेटधारकांना गुरुवारपासून वेतन हस्तांतरणात अडचणी येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पेमेंट वॉलेटच्या ‘केवायसी’ पूर्तततेकरिता धारकांना त्यांचे पॅन, निवडणूक ओळखपत्र, आधार क्रमांक जोडणे बंधनकारक आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या ‘केवायसी’च्या सक्तीच्या निर्णयामुळे पेमेंट वॉलेटच्या कार्यान्वयनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण ‘केवायसी’बाबतची पूर्तता आतापर्यंत ४० ते ४५ टक्के ग्राहकांनीच केली आहे आणि केवायसी न केलेल्या ग्राहकांच्या वॉलेट वापरावर र्निबध येणार आहेत.

विनय कलंत्री, संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक, द मोबाइल वॉलेट