ग्राहकाला हवी असलेली मोबाइल जोडणी अगदी काही मिनिटांत देऊन, ग्राहकाच्या नावे अधिकृतपणे वितरित प्रीपेड सिमकार्ड आणि मोबाइल क्रमांक विनाविलंब मिळवून देणारी ‘ई-केवायसी’ची कागदरहित प्रक्रिया मुंबईस्थित सुविधा इन्फोसव्र्ह या कंपनीने प्रस्तुत केली आहे. मुंबईत अलीकडेच अॅक्सिस बँकेच्या माध्यमातून ‘ई-केवायसी’ सुविधेचा प्रथमच दूरसंचार सेवा क्षेत्रासाठी वापर करण्यात आला.
देशभरात बोगस सिमकार्डाच्या बाजारात होणाऱ्या वितरणाला यातून पायबंद बसेल, शिवाय दूरसंचार कंपन्यांना नवे ग्राहक मिळविण्याच्या प्रक्रियेला लागणारा वेळही खूपच कमी होणार आहे. दूरसंचार सेवा प्रदात्यांची कार्यक्षमता वाढण्यासाठी तसेच अपप्रवृत्तींना टाळून तळच्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या त्यांच्या उद्दिष्टाला ही ‘ई-केवायसी’च्या माध्यमातून ग्राहकाच्या ओळखीची वैधता पटवून देणारी प्रक्रिया मोलाची ठरेल, असे सुविधा इन्फोसव्र्हचे अध्यक्ष परेश राजदे यांनी सांगितले.
बोगस सिमकार्डाचे वाढते प्रमाण, त्यांचा गुन्हेगारी कृत्यांसाठी वापराची अनेक प्रकरणे २००७ ते २०१२ या पाच वर्षांच्या कालावधीत पुढे आली असून, ज्या कंपन्यांच्या सिमकार्डाचा असा गैरवापर उघडकीस आला त्यांच्याकडून नियामक संस्थांनी तब्बल २८०० कोटी रुपयांचा दंडही या काळात वसूल केला आहे. त्यानंतर दूरसंचार कंपन्यांकडून अधिक खबरदारी घेत राबविण्यात आलेल्या सावध प्रक्रियेने नवीन मोबाइल जोडणीसाठी लागणाऱ्या कालावधीत अधिकच वाढ झाली होती. त्यावर ही नवीन प्रक्रिया त्यांच्यासाठी खूपच मदतकारक ठरणार आहे, असे राजदे यांनी सांगितले. देशातील आघाडीच्या दूरसंचार सेवा प्रदात्या कंपन्यांशी या संबंधाने चर्चा सुरू असून अंतिम करार लवकरच अपेक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दूरसंचार कंपन्यांसाठी ‘ई-केवायसी’ची उपयुक्तता कशी?
‘ई-केवायसी’ ही संपूर्ण कागदरहित प्रक्रिया असून, अर्जदार ग्राहकाला त्याची ओळख पटवून देण्यासाठी एकही दस्तऐवज देण्याची गरज पडत नाही. अर्जदाराचा आधार क्रमांक आणि नमूद बायोमेट्रिक तपशिलांच्या आधारे सुविधा इन्फोसव्र्हकडून त्याच्या ओळखीचे अर्थात ‘नो युअर कस्टमर’ प्रक्रियेचे प्रमाणीकरण ‘यूआयडीएआय’च्या माध्यमातून केली जाते. हा तपशील ‘इन्क्रिप्टेड फाइल्स’मार्फत दूरसंचार प्रदात्या कंपन्यांपर्यंत पोहोचवून त्या अर्जदाराच्या वैधतेची ताबडतोब खात्री पटविली जाते. याच प्रक्रियेसाठी एरव्ही किमान ४८ तास, तर कमाल सात दिवसांचा कालावधी लागत असे.