07 March 2021

News Flash

‘म्युच्युअल फंडातील नव-गुंतवणूकदारांनी जोखीम पातळीशी प्रतारणा करू नये’

एल अ‍ॅण्ड टी म्युच्युअल फंडाच्या मालमत्तेने नुकताच ५०,००० कोटी रुपयांचा टप्पा पार केला.

म्युच्युअल फंड उद्योगाच्या नियमन समितीचे सदस्य कैलाश कुलकर्णी

एल अ‍ॅण्ड टी म्युच्युअल फंडाच्या मालमत्तेने नुकताच ५०,००० कोटी रुपयांचा टप्पा पार केला. कार्यान्वयनाच्या पहिल्या पाच वर्षांत हा टप्पा गाठणाऱ्या कंपनीच्या यशानिमित्ताने या फंड घराण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ‘अ‍ॅम्फी’ या म्युच्युअल फंड उद्योगाच्या नियमन समितीचे एक सदस्य कैलाश कुलकर्णी यांच्याशी ‘लोकसत्ता’ने संवाद साधला .

* तुमच्या फंड घराण्याने ५०,००० कोटी रुपयांच्या गंगाजळीचा टप्पा पार केला आहे. या यशाबद्दल काय सांगाल?

– एल अ‍ॅण्ड टी फायनान्शिअल होल्डिंग्जने म्युच्युअल फंड व्यवसायाला सुरुवात केली तेव्हा- मार्च २०१२ मध्ये एल अ‍ॅण्ड टी म्युच्युअल फंडाची मालमत्ता ११,५०० हजार कोटी रुपये होती. त्या वेळी आमची मालमत्ता व्यवस्थापन कंपनी कशी असावी, याबद्दल आमची धोरणे स्पष्ट होती. आम्ही आमच्या व्यवसायाची काही सूत्रे निश्चित केली होती. आम्हाला गुंतवणूकदारांसाठी दीर्घकाळात संपत्तीनिर्मिती करणारी कंपनी असावी, असे आमचे धोरण होते. आमचे प्रयत्न या दृष्टीने सुरू होते. आम्ही आमच्या धोरणात बदल केला नाही. आमचा भर गुंतवणूकयोग्य चांगले मूल्य असलेल्या कंपन्या निवडून अशा कंपन्यांचा त्यांना साजेशा फंडात त्यांचा समावेश केला. त्यामुळे आम्हाच्या योजनांचा परतावा दिसून येण्यास थोडा वेळ जाऊ द्यावा लागला. रोखे गुंतवणुकीत आम्ही नेमस्त गुंतवणूकदाराच्या भूमिकेत आहोत. आमचा भर जास्त व्याज दरापेक्षा मुदलाला सुरक्षितता असलेल्या रोख्यांवर असतो. तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा की, आमच्या योजनांची नावे आणि ँप्रत्यक्ष गुंतवणुका यात फरक केला गेला नाही यापुढे केला जाणार नाही.

आमचा मिड कॅप फंड हा ८५-९० टक्के मिड कॅप गुंतवणूक असलेला फंड आहे. ‘इमर्जिग बिझनेसेस’ हा स्मॉल आणि मिड कॅप फंड असायला हवा आणि तसाच तो आहे. या फंडाच्या गुंतवणुकीत मिड कॅप अधिक आणि स्मॉल कॅप कमी असे आढळणार नाही. आमचे फंड ‘नाव सोनुबाई..’ असे असणार नाहीत याची आम्ही दक्षता घेतली. गुंतवणूकदारांना ज्याची ग्वाही दिली तशी आमची गुंतवणूक आहे. आम्हाला गुंतवणूकदार समुदायाला हे सांगण्यास दोन वर्षांचा कालावधी लागला. आमच्या या चांगल्या गोष्टी गुंतवणूकदारांना पटल्यावर आमच्या फंडात गुंतवणुकीचा ओघ सुरू आहे. यामुळे आम्ही ५०,००० कोटी रुपयांचा टप्पा गाठू शकलो. आमच्यासाठी ५०,००० कोटी रुपयांचा टप्पा हा एक मैलाचा दगड असून अजून आम्हाला अनेक मैलांचे दगड खुणावत आहेत. भविष्यात आम्ही असे अनेक टप्पे पार करू आणि गुंतवणूकदारांसाठी अशीच संपत्तीची निर्मिती करीत राहू.

* म्युच्युअल फंड उद्योगाची वाढ ही मागील तीन वर्षांमध्ये वेगाने होत आहे. तुमचे याबाबतचे काय निरीक्षण आहे?

– म्युच्युअल फंड उद्योगात निधीचा ओघ वाढला आहे याला अनेक करणे आहेत. पहिले कारण म्युच्युअल फंडाबद्दल जागरूकता वाढत आहे. दुसरे कारण कमी होणाऱ्या व्याज दरांमुळे जे गुंतवणूकदार आजपर्यंत मुदत ठेव, पोस्टाच्या अल्पबचत योजना यांसारख्या गुंतवणूक साधनांच्या वापर करीत होते ते गुंतवणूकदार आज पारंपरिक साधनांची कास सोडून म्युच्युअल फंडाकडे वळले आहेत. वेगवेगळ्या मंचावरून किंवा वर्तमानपत्र किंवा अन्य माध्यमांतून आम्ही हेच सांगत असतो की, तुमच्या जोखीम पातळीशी प्रतारणा करून गुंतवणूक साधने निवडू नका. म्युच्युअल फंडात पहिल्यांदा गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी कमी जोखमीचा पर्याय निवडणे आवश्यक आहे. त्यांच्यासाठी ‘इक्विटी सेव्हिंग्ज फंड’ हा चांगला पर्याय आहे. या फंडातून मिळणारा परतावा हा एका वर्षांच्या बँकेच्या मुदत ठेवींवरील परताव्याइतका असतो. शिवाय हा परतावा करमुक्तदेखील असतो. मुदत ठेवींवरील व्याजाइतका मिळणाऱ्या करमुक्त परताव्याची गुंतवणूकदारांनी नक्कीच कास धरायला हवी. इक्विटी सेव्हिंग्ज फंड, डायनॅमिक इक्विटी फंड किंवा बॅलंस्ड फंड यापैकी एकाचा पर्याय निवडायला हवा. इक्विटी फंडात गुंतवणूक करणे टाळावे. इक्विटी फंडात गुंतवणूक करायची असेलच तर एसआयपी किंवा एसटीपी माध्यमातून गुंतवणूक करायला हवी.

*  तुम्ही ‘अ‍ॅम्फी’च्या संचालक मंडळाचे एक सदस्य आहात. या नात्याने गुंतवणूकदार समुदायाला काय सांगाल?

– मागील काळात गुंतवणुकीवर परताव्याचा दर १४-१५ टक्केदरम्यान होता. गुंतवणुकीवरील परताव्याचा दर नेहमीच ‘रिस्क फ्री रेट ऑफ रिटर्न’ (सरकारच्या रोख्यांचा व्याज दर) अधिक ‘रिस्क प्रीमियम’ असा ठरत असतो. रिस्क प्रीमियम हा गुंतवणुकीवरील जोखमीवर ठरत असतो. मागील दोन वर्षांत सरकारी रोख्यांचे व्याज दर कमी झाल्यामुळे आधीच्या तुलनेत ‘रिस्क फ्री रेट ऑफ रिटर्न’मध्ये किमान २ टक्क्यांची घट झाली आहे. साहजिकच याची परिणती रिस्क प्रीमियम घटण्यात होईल. भविष्यात गुंतवणूकदारांनी इक्विटी फंडाकडून परताव्याची अपेक्षा २ ते ३ टक्क्यांनी कमी करून १० ते १२ टक्के इतपतच ठेवायला हवी. नव्याने होत असलेली गुंतवणूक यादरम्यान परतावा देईल. गुंतवणूकदारांनी अधिक परताव्याच्या अपेक्षेने गुंतवणूक केल्यास अपेक्षाभंग होईल. अ‍ॅम्फीच्या नियमन समितीचा एक सदस्य या नात्याने मला हेच सांगायचे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2017 1:10 am

Web Title: l and t mutual fund assets recently crossed the rs 50000 crore mark
Next Stories
1 ‘कोका कोला’ कंपनीने आणला ‘मिनिट मेड पल्पी संत्रा’ फ्लेवर
2 ऑगस्टमध्ये वाहन कंपन्यांच्या विक्रीत दोन अंकी वाढ
3 आदित्य बिर्ला कॅपिटलची घसरणीसह नोंदणी
Just Now!
X