मुंबई : अभियांत्रिकी पायाभूत क्षेत्रातील आघाडीची कंपनी लार्सन अँड टुब्रोने गुरुवारी, २३ ऑगस्ट रोजी भागधारकांची वार्षिक सभा बोलावली आहे. या दिवशी संचालक मंडळाच्या बैठकीत समभाग पुनर्खरेदीचा प्रस्ताव चर्चेला येणार आहे. कंपनीच्या पाच दशकातील ही पहिलीच पुनर्खरेदी प्रक्रिया असल्याचे सांगतिले जाते.

कंपनीने काही व्यवसाय विकण्याचे प्रस्तावित केले आहेत. त्याकरिता ही प्रक्रिया पार पडत आहे. ३० जून रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीचा नफ्यात ३६ टक्के वाढ झाली आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे सोमवारच्या व्यवहारात समभाग ६ टक्क्य़ांनी उंचावत मुंबई शेअर बाजारात बाजारमूल्य ११,७५९.७९ कोटींनी वाढले.

विश्लेषकांच्या मते, हा सौदा भारतीय बाजारातील मोठय़ा रक्कमेचा ठरण्याची शक्यता आहे. या आधी टीसीएसने १६,००० कोटी रुपयांची समभाग पुनर्खरेदी केली होती.

लार्सन अँड टुब्रो संचालक मंडळाच्या आगामी बैठकीत शेअर खरेदी प्रस्तवावर चर्चा होणार असून संचालक मंडळाने प्रस्ताव मान्य केल्यास भागधारकांच्या मंजुरीसाठी विशेष सभा बोलाविण्यात येईल. या प्रास्तावित समभाग  खरेदीसाठी नेमकी किती रक्कम खर्च होणार किंवा किती समभागांची पुनर्खरेदी होणार याचा उल्लेख प्रस्तावात नाही.

‘सेबीचे नियम आणि लार्सन अँड टुब्रोचा ३१ मार्च २०१८ च्या ताळेबंदानुसार हा प्रस्ताव १४,००० कोटींपर्यतचा असू शकतो. नजीकच्या काळात लार्सन अँड टुब्रोचा समभाग १,६५० चा भाव गाठेल, अशी आशा असून कंपनीचा समावेश खरेदी शिफारसपात्र कंपन्यांत आहे’, असे प्रतिपादन ‘शेरखान’ दलाली पेढीचे भांडवली वस्तू आणि उर्जा समभाग विश्लेषक आशुतोष अडसरे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

‘टीसीएस, इन्फोसिससारख्या ताळेबंदात अतिरिक्त रोकड सुलभता असलेल्या कंपन्या समभागांची पुनर्खरेदी करतात. लार्सन अँड टुब्रोसारख्या कंपनीवर विशेष कर्ज नसूनसुद्धा त्यांनी भांडवलाची गरज आणि भांडवलाचा कार्यक्षम वापर करण्याच्या उद्देशांनी आपले काही व्यवसाय विकावयास काढले आहेत. भारतात लार्सन अँड टुब्रोसारख्या अभियांत्रिकी क्षेत्रातील कंपनीला व्यवसाय विस्तारास मोठा वाव आहे. हा समभागाची बाजारातील किंमत कंपनीच्या अंगभूत किंमतीपेक्षा कमी आहे, असे कंपनी व्यवस्थापनाचे मत असावे’, असे प्रतिपादन  ‘प्रभुदास लीलाधर’च्या ‘पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सव्‍‌र्हिस’चे प्रमुख अजय बोडके यांनी सांगितले.

लार्सन अँड टुब्रो

खुला   रु.१,३००

सत्रझेप  रु.१,३३१

सत्रतळ  रु.१,२८२

बंद     रु.१,३२४