रायगड जिल्ह्य़ामध्ये दोन औद्योगिक उद्यानाची योजना

मुंबई : विविध जाडी, आकार आणि रंगाच्या प्री-पेंटेड/ कलर कोटेड गाल्व्हॉल्युम आणि गाल्व्हनाइझ्ड कॉइल्स आणि प्रोफाइल्सच्या उत्पादनातील ला टिम मेटल अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज लि. (आधीचे नाव ड्रिलको मेटल कार्बाइड्स लि.)ने आर्थिक वर्ष २०१८-१९ अखेरीस उलाढाल ३०० कोटी रुपयांवर, तर २०१९-२० अखेर उलाढालीत ५०० कोटी रुपयांचा आकडा पार करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे.

आपल्या व्यवसायात कायापालट घडवून आणत ला टिम मेटल अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज जूनअखेर तिमाहीत २.१७ कोटी रुपयांच्या नफा कमावणारी कामगिरी केली आहे. आधीच्या तिमाहीत म्हणजे कंपनीला १.४६ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. आयातीला पर्याय देणारी कंपनीची उत्पादने ही बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार, अंतर्गत रचनाकार यांच्याकडून वापरली जातात.

ला टिम सोर्सिग या उपकंपनीमार्फत उमरगाव येथे ५ एकर क्षेत्रफळावरील उत्पादन प्रकल्पातून कलर्ड कोटेड कॉइल्स आणि प्रोफाइल शीट्सचे ला टीमने व्यावसायिक उत्पादन सुरू केले आहे. या अद्ययावत प्रकल्पामधील सर्व यंत्रसामग्री परदेशातून आयात करण्यात आली असून, त्याची उत्पादन क्षमता १.१० लाख टन इतकी आहे. नजीकच्या काळात विशाखापट्टणम आणि नागपूर येथेही अशाच प्रकारचे प्रकल्प उभारण्याची कंपनीची योजना आहे, असे ला टिम मेटलचे अध्यक्ष राहुल तिम्बाडिया यांनी स्पष्ट केले.

खोपोली-पाली रोड येथील औद्योगिक क्षेत्रातील १०० एकरपैकी २० एकरावर कंपनीकडून औद्योगिक उद्यान विकसित केले जात आहे. शिवाय, दिघी बंदराजवळच्या ७२ एकर क्षेत्रांवरही असेच उद्यान विकसित केले जात आहे.