भारताला सक्षम अर्थतज्ज्ञांची मोठी कमतरता भासत असल्याचे मत खुद्द आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे अर्थतज्ज्ञ कामकाज पाहिलेल्या आणि रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी व्यक्त केले.
मुंबईतील ‘लॉर्ड मेघनाद देसाई अकॅडमी ऑफ इकॉनॉमिक्स’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अकॅडमीचे अध्यक्ष लॉर्ड मेघनाद देसाई, बिर्ला समूहाचे मुख्य अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे आदीेंसह आर्थिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते.
गव्हर्नर राजन याप्रसंगी बोलताना म्हणाले की, भारताने अर्थतज्ज्ञांची एकेकाळच्या तगडय़ा पिढीचा वारसा गमावला आहे. अर्थव्यवस्थेत संधी निर्माण होत असताना देशातील अनेक जण अर्थशास्त्रातील उच्च शिक्षणासाठी भारताबाहेर जात असत; आता मात्र तसे चित्र दिसत नाही.
राजन म्हणाले की, अर्थशास्त्राच्या मूलभूत बाबींची चांगली जाण असणारे अर्थतज्ज्ञ भारताला हवे आहेत. अनेकदा अज्ञानापोटी अर्थव्यवस्थेविषयीची धोरणे राबविली जातात.