२०२३ पर्यंत भारतातील उत्पादन पाया अधिक घट्ट करणार

मुंबई : औद्योगिक रसायनाच्या निर्मितीतील लॅन्क्सेसने भारतातील उत्पादन पाया अधिक भक्कम करण्याच्या उद्देशाने २०२३ पर्यंत १,२५० कोटींची गुंतवणूक करण्याची योजना गुरुवारी जाहीर केली. केमिकल इंटरमिडिएट्स, उच्च कामगिरीचे प्लास्टिक्स आणि जलशुद्धी प्रक्रिया उत्पादने ही कंपनीची गुंतवणुकीची प्रमुख क्षेत्रे असतील.

मुंबईतील पत्रकार परिषदेत जर्मनीच्या लॅन्क्सेस एजीच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य हबर्ट फिन्क यांनी जगातील सर्वात जलद गतीने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताचा उल्लेख करताना, रसायन उद्योगासाठी सर्वात अनुकूल वातावरण येथे असल्याचे नमूद केले. देशातील रसायन बाजारपेठेच्या प्रचंड क्षमतांचा लाभ घेण्याचा प्रयत्न म्हणून हे गुंतवणुकीचे नियोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वर्ष २००४ मध्ये भारतातील स्थापनेपासूनच लॅन्क्सेसने उत्पादन पाया व व्यवसाय स्थिर गतीने वाढवत आणला आहे. गेल्या दहा वर्षांत कंपनीचे देशातील विक्री दुपटीने वाढत एकूण उत्पन्न १,००८ कोटींवरून २,६०८ कोटींवर पोहोचले आहे.

विद्यमान २०१८ सालाच्या पहिल्या नऊ  महिन्यांत  महसूलामध्ये गेल्या वर्षांतील याच कालावधीच्या तुलनेत १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे लॅन्क्सेस इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक नीलांजन बॅनर्जी यांनी सांगितले.

ठाण्यात मुख्यालय असलेल्या या कंपनीची देशभरात १० उत्पादन सुविधा असून, एकूण ९०० कर्मचारी आहेत.