17 December 2017

News Flash

संपत्ती निर्मितीसाठी गुंतवणूक दीर्घकालीन हवी!

अर्थसूज्ञतेच्या फराळाची ही तिसरी थाळी..

कैलाश कुलकर्णी | Updated: October 13, 2017 1:29 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

दिवाळीच्या निमित्ताने लोकसत्ताने गुंतवणूकदारांसाठी योजलेला अर्थसूज्ञतेच्या फराळाची ही तिसरी थाळी..

मला पहिला बोनस मिळाला तेव्हा मी आजच्या इतका अर्थसाक्षर नव्हतो. साहजिकच बचतीच्या संचयापेक्षा उपभोगाला प्राधान्य देत सर्व बोनस त्यावेळी हव्या त्या गोष्टी खर्च करण्यावर केला. आज खर्च केलेल्या पैशाबद्दल नक्कीच रुखरुख वाटते. बोनसचा काही हिस्सा नक्कीच सणासुदीची खरेदी करण्यात खर्च करायला हवा. मात्र उर्वरित पैशाचा विनियोग भविष्यातील तरतुदींसाठी संपत्तीनिर्मितीसाठी व्हायला हवा. संपत्तीनिर्मितीसाठी समभाग गुंतवणुकीपेक्षा दुसरा चांगला पर्याय असू शकत नाही. मागील ३० वर्षांत लार्ज कॅप समभाग गुंतवणुकीने वार्षिक १५ टक्क्यांचा परतावा दिला आहे. इतका उत्तम परतावा देऊनदेखील अनेक जण मनात समभाग गुंतवणुकीबद्दल भीती बाळगून आहेत. नजीकच्या काळात समभाग गुंतवणूक धोकादायक असली तरी योग्य मार्गाने गेल्यास समभाग गुंतवणूकच संपत्तीची निर्मिती करते. भारतीय बाजारसुद्धा स्थानिक आणि जागतिक घडामोडीमुळे चढ-उतारांना सामोरा जाईल. परंतु दीर्घ कालावधीत भारतीय भांडवली बाजार संपत्तीची निर्मिती करू शकेल.

कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात संचयाचा कालावधी आणि त्यानंतर या संचयाचा उपभोगाचा कालावधी असतो. सर्वसाधारणपणे जीवनाचा वय वर्षे २२ ते ६० हा टप्पा संचयाचा तर ६० नंतरचा टप्पा हा संचयाचा उपभोग घेण्याचा असतो. संचयाच्या टप्प्यात जर बचतीचा योग्य विनियोग केला तर ६० नंतरचे जीवन सुसह्य़ होते. संचयाच्या टप्प्यातील सर्वच पैसे हे वयाच्या साठाव्या वर्षी लागतातच असे नाही. आपली कमावती वर्षे किती शिल्लक आहेत यानुसार संपत्तीच्या निर्मितीसाठी योग्य साधनांची निवड करणे गरजेचे असते. जर सेवानिवृत्त होण्यासाठी सात वर्षांहून अधिक कालावधी शिल्लक असेल तर समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडात केलेली गुंतवणूक दोन आकडय़ांतील परतावा मिळवून देईल. सामान्यपणे समभाग गुंतवणुकीतून मिळणारा परतावा हा ‘रिस्क फ्री रेट ऑफ रिटर्न’ (केंद्र सरकारच्या १० वर्षे मुदतीच्या रोख्यांचा परतावा) अधिक महागाईचा दर इतका असतोच. मागील दोन वर्षांत रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो दरात कपात केल्याने आपल्या देशातील ‘रिस्क फ्री रेट ऑफ रिटर्न’ दोन वर्षांपूर्वीच्या ८.५ टक्क्यांवरून विद्यमान ६.५ टक्क्यांच्या पातळीवर आला आहे. महागाईचा दरदेखील कमी झाल्यामुळे भविष्यातील परताव्याचा अपेक्षित दर हा १४ टक्क्यांवरून १० टक्के गृहीत धरणे योग्य ठरेल.

भारताची अर्थव्यवस्था ही उपभोग घेणाऱ्यांची (‘कन्झम्शन ड्रिव्हन इकॉनॉमी’) असल्याने पुढील २०-२५ कुठल्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करताना अर्थव्यवस्थेचा आकार आणि वृद्धी दर यांचा विचार केला जातो. आज भारतीय अर्थव्यवस्थेचा डॉलरमध्ये सहावा क्रमांक आहे. भारताचा वृद्धीदर ६.५-७ टक्के अपेक्षित धरला आणि रुपयाचे डॉलरच्या तुलनेत अवमूल्यन ३ टक्के गृहीत धरले तरी २०५० मध्ये भारताची अर्थव्यवस्था अमेरिका आणि चीननंतर तिसऱ्या क्रमांकावर असेल. मागील वर्षी भारतीय अर्थव्यवस्थेने फ्रान्सला मागे टाकले. अशा अर्थव्यवस्थेत समभाग गुंतवणुकीला दीर्घ कालावधीत नक्कीच सुगीचे दिवस येतील. म्हणूनच बोनसचा अंशत: विनियोग संपत्तीनिर्मितीसाठी आणि पर्यायाने समभाग गुंतवणुकीत करणे हिताचे ठरेल.

गुंतवणुकीचा कालावधी सात वर्षांपेक्षा कमी असल्यास गुंतवणुकीसाठी लार्ज कॅप फंडाची निवड करणे योग्य ठरेल. गुंतवणुकीचा कालावधी अधिक असल्यास मिड कॅप फंडाची निवड करावी. या दोन्ही प्रकारच्या फंडासाठी आमच्या फंड घराण्याचा अनुक्रमे एल अ‍ॅण्ड टी इक्विटी फंड आणि एल अ‍ॅण्ड टी मिड कॅप फंडाची निवड केल्यास आनंदच होईल.

कैलाश कुलकर्णी

(लेखक एल अ‍ॅण्ड टी म्युच्युअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)

First Published on October 13, 2017 1:29 am

Web Title: large cap equity mutual funds