गुंतवणूक हा विषय सध्या आपल्याकडे चर्चेचा आणि सक्रियतेने समजून घेण्याचा बनावा ही खरे तर समाधानाची बाब आहे. गुंतवणूक जगतातील चर्चामधील ‘अल्फा’ हा असाच एक महत्त्वाचा आणि कायम वादाचा घटक होय. भारताचा भांडवली बाजार हा सक्रिय निधी व्यवस्थापनाचा वरचष्मा असलेला आणि संदर्भ निर्देशांकांपेक्षा (बेन्चमार्क) अधिक परताव्याच्या (अर्थात ‘अल्फा’च्या) शोधात येथे निधी व्यवस्थापक गुंतलेले असतात, असे म्हटले जाते. ते खरेही आहे. कारण विकसित पाश्चात्य जगतातील बाजारांचा अवकाश हा निष्क्रिय (पॅसिव्ह) निधी व्यवस्थापकांकडून बहुतांश व्यापला गेला आहे. तेथील निष्क्रिय व्यवस्थापित निधीचा भारताच्या बाजारात मात्र खेळखंडोबा सुरू आहे. कारण एकच भारतात अल्फा अजूनही टिकून असल्याची धारणा.. हे जरी व्यापक अर्थाने खरे असले तरी या संदर्भात लार्ज कॅप वर्गवारीचा एकवार पुनर्वेध आवश्यक ठरतो.

एक गोष्ट स्पष्टच आहे की, लार्ज कॅप फंडांचा अल्फा घसरत चालला आहे. निफ्टी ५० निर्देशांकांचा एकत्रित परतावा (लाभांशासह) हा अलिकडच्या वर्षांत हा या फंडांच्या तीन वर्षांच्या चलत सरासरी परताव्यापेक्षा अधिक राहिला आहे. २००० ते २००७ दरम्यान तीन वर्षांचा लार्ज कॅप फंडांचा चलत सरासरी परतावा हा निफ्टी ५० निर्देशांकापेक्षा ४ टक्के अधिक राहिला आहे. तो २००८ ते २०१७ या दरम्यान जेमतेम एक टक्क्यांइतकाच आहे.

शिवाय, वेगवेगळ्या लार्ज-कॅप फंडाच्या परताव्यातील तफावतही मोठय़ा प्रमाणात संकोचत आली आहे. २००५ ते २००७ या कालावधीतील लार्ज-कॅप फंडांच्या परताव्यांमधील फरक जवळपास १० टक्क्यांचा होता जो अलिकडच्या वर्षांत पाच टक्क्यांइतका कमी झाला आहे. फंडांची संख्या वाढली आणि त्यांचे आकारमानही वाढले हे खरे असले तरी, प्रत्येकाचे पोर्टफोलिओ पूर्वीपेक्षा परस्परांशी अधिक जुळणारे आणि संदर्भ निर्देशांकांवरच अधिकाधिक केंद्रित झाले आहेत, या वस्तुस्थितीलाही लक्षात घेतले पाहिजे.

लार्ज कॅप फंडांचे निधी व्यवस्थापक साधारणपणे ५० आणि त्या आसपास समभागांचा डायव्हर्सिफाइड पोर्टफोलियो बनवीत असतात. वास्तव हे की, त्यांच्या पोर्टफोलियोत संदर्भ निर्देशांकांचे जवळपास प्रतिबिंब उमटताना दिसत आहे. ‘ट्रॅकिंग एरर’ अर्थात संदर्भ निर्देशांकाशी संलग्न जोखीम घेण्याचे प्रमाण हे लार्ज कॅप फंडांच्या निधी व्यवस्थापकांबाबत गत १० वर्षांत कमालीचे घटले आहे. २००१ ते २००७ या काळात सरासरी ट्रॅकिंग एररचे प्रमाण हे १०.०१ टक्के असे होते, जे २००८ ते २०१७ या कालावधीत ३.८१ टक्के असे लक्षणीय घसरले आहे.

लार्ज कॅप वर्गवारीचा अल्फा घसरण्याची अनेक कारणे दिली जाऊ  शकतात. भारतीय भांडवली बाजार अधिक कार्यक्षम बनला आहे. लार्ज कॅप समभागांचा माग घेणाऱ्या विश्लेषकांच्या वाढती संख्या व सक्रियतेमुळे निधी व्यवस्थापकांसाठी माहितीची उणीव पूर्वीइतकी राहिलेली नाही. वाढती गुंतवणूक गंगाजळी (एयूएम) निधी व्यवस्थापकांवर किमान जोखीम घेतली जावी असा ताण देणारी असेल कदाचित. त्यामुळेच ते शक्य तितके संदर्भ निर्देशांकाला बिलगून आणि त्या पल्याड समभागांचा विचार करायला बिचकत असावेत.

परंतु अल्फा घसरणीच्या आणि गंगाजळी फुगत चालली असल्याच्या याच काळात फंडांचा शुल्क भार (एक्स्पेन्स रेशो) मात्र घटलेला नाही. ऑगस्ट २००७ मध्ये लार्ज कॅप फंडांचा सरासरी शुल्क भार २.३५ टक्के इतका होता, जो ऑगस्ट २०१७ पर्यंतच्या तीन वर्षांच्या काळासाठी सरासरी २.९ टक्क्यांपेक्षा अधिक राहिला आहे.

नेमकी उलट स्थिती मिड-कॅप आणि मल्टि-कॅप वर्गवारीची आहे असे म्हणता येईल. या वर्गवारीत निर्देशांकापेक्षा अधिक परताव्याच्या संधी अर्थात अल्फा आजही टिकून आहे. जोखीम संतुलित कामगिरी दर्शविणारे ‘इन्फर्मेशन रेशो’ हे लार्ज कॅप फंडांसाठी मल्टि-कॅप फंडांच्या तुलनेत कमी असल्याचे गत १० वर्षांवर नजर फिरविल्यास आढळून येते. संदर्भ निर्देशांकाशी फारशी फारकत न घेता लार्ज-कॅपमधील सक्रिय समभागांभोवतीच घुटमळणारे निधी व्यवस्थापक तरीही समभाग निवडीसाठी त्यांचे ‘बॉटम अप’ धोरण असल्याचे सांगत असतात. विश्लेषक आणि निधी व्यवस्थापकांकडून मिड-कॅप समभागांचा मागोवा पुरत्या कसोशीने घेतला जात नाही. किंबहुना हेच तेथे अल्फा शाबूत असण्याचे आणि यापुढे राहण्याचे कारण असावे.

लार्ज कॅप गुंतवणूक धोरण आणि गुंतवणूकदारांनी या बदलांचा नेमका अर्थ समजून घेतला पाहिजे.

ध्यानात घ्यावयाच्या गोष्टी सारांशात अशा  :

  • संदर्भ निर्देशांकाचेच बोट धरून चालणाऱ्या पारंपरिक लार्ज कॅप फंडांना त्यांचा संकोचलेला अल्फा पाहता, खर्चाच्या दृष्टीने अधिक कार्यक्षम बनावे लागेल. अन्यथा अल्पखर्चीक, स्मार्ट बीटा फंड अथवा निष्क्रिय (पॅसिव्ह) व्यवस्थापन असलेल्या फंडांकडे गुंतवणूकदारांचे वळण क्रमप्राप्त ठरेल.
  • निरंतर अल्फा संधींचा (निर्देशांकापेक्षा सरस परताव्याच्या) शोध हे मल्टि-कॅप आणि मिड-कॅप फंडांचे वैशिष्टय़ राहिले असून, ते पुढेही कायम राहायला हवे. संदर्भ निर्देशांकापासून विचलनावर भर देणाऱ्या गुंतवणूक धोरणावर गुंतवणूकदारांचा कटाक्ष हवा.
  • संदर्भ निर्देशांकांशी बिलगून नसलेले आणि अल्पतम जोखीमेसह तितकाच वा जास्त परतावा देणारे (जोखीम संतुलित श्रेष्ठ परतावा) ‘डायनॅमिक अलोकेशन’ धोरण असणारे अपारंपरिक फंड आणि अल्टरनेटिव्ह फंड हे वेगाने पारंपरिक लार्ज कॅप योजनांची जागा व्यापत चालले आहेत. लार्ज कॅप गुंतवणूकदारांनीही ते आजमावून पाहावेत.

(लेखिका, एडेल्वाइज अ‍ॅसेट मॅनेजमेंट लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी)

(लेखातील तपशील व्हॅल्यू रिसर्चने केलेल्या सक्रिय लार्ज कॅप फंडांच्या वर्गवारीवर बेतलेला आणि एस एमएफच्या  माहितीवर आधारित.)