15 August 2020

News Flash

‘एनएसई’कडून ३० लाख नवगुंतवणूकदारांची भर

भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांच्या वाढत्या कलाची पुष्टी करणारी आकडेवारीही बाजारमंचाने जाहीर केली आहे.

 

एकूण सक्रिय गुंतवणूकदारांचा तीन कोटींचा टप्पा पार

मुंबई : देशातील सर्वात मोठा भांडवली बाजार असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात ‘एनएसई’ने जानेवारी २०२० मध्ये पहिल्यांदाच तीन कोटी गुंतवणूकदारांचा टप्पा गाठला आहे.

सरलेल्या, २०१९ सालात बाजारात ३० लाख नव्या गुंतवणूकदारांची भर पडली असून वार्षिक तुलनेत ही वाढ ४.५ टक्के नोंदली गेली आहे. वार्षिक ११ टक्के  वेगाने बाजाराने गेल्या पाच वर्षांत १.२० कोटी नवीन गुंतवणूकदार जोडले असल्याची माहिती मंगळवारी जाहीर करण्यात आली. यानिमित्ताने, बाजाराने येत्या तीन वर्षांत ५ कोटी गुंतवणूकदार जोडण्याचे लक्ष्य जाहीर केले असल्याचे राष्ट्रीय शेअर बाजाराचे व्यवस्थापैकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम लिमये यांनी सांगितले.

भांडवली बाजाराचे नियामक ‘सेबी’द्वारे सुलभ होत असलेल्या प्रक्रियेमुळे गुंतवणूकदारांचा कल वाढत असून पारंपरिक पर्यायांव्यतिरिक्त भांडवली बाजारालाही गुंतवणूकदारांकडून अंगिकारले जात असल्याचे लिमये म्हणाले. राष्ट्रीय शेअर बाजाराने गेल्या तीन वर्षांत १० हजारांहून अधिक गुंतवणूक जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित केले. या माध्यमातून ५.२५ लाख उत्सुक गुंतवणूकदारांशी संपर्क साधण्यात आला. १० हजार कार्यक्रमांपैकी तब्बल ७५ टक्के कार्यक्रम हे मोठय़ा महानगरांव्यतिरिक्त अन्य शहरांमध्ये होते, असे एनएसईने म्हटले आहे.

भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांच्या वाढत्या कलाची पुष्टी करणारी आकडेवारीही बाजारमंचाने जाहीर केली आहे. यानुसार, १०० शहरांव्यतिरिक्त अन्य शहरांमधील नव्या गुंतवणूकदारांचा हिस्सा ३३.७ टक्के राहिला आहे. तर मोठय़ा ५० शहरांपलिकडील अन्य शहरांमधील गुंतवणूकदारांचा हिस्सा ४८ टक्के नोंदला गेला आहे. यातून भांडवली बाजारातील गुंतवणूकदार वर्गाला सखोलता मिळत असल्याचे दिसून येते. नवीन गुंतवणूकदार जोडणीमध्ये देशाची आर्थिक राजधानी व राष्ट्रीय शेअर बाजाराचे मुख्यालय, मुंबईचा समावेश असलेल्या देशाच्या पश्चिम विभागाचे प्रमाण ३३ टक्के राहिले आहे. तर देशाच्या उत्तर, दक्षिण व पूर्व विभागांचा हिस्सा अनुक्रमे ३२, २५ व १० टक्के असा नोंदला गेला आहे.

मुंबई – महाराष्ट्राचा टक्का सर्वाधिक

नवीन गुंतवणूकदार जोडले जाण्यामध्ये देशातील १० राज्ये आघाडीवर राहिली आहेत. त्यात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक, १८.३ टक्के नोंदला गेला आहे. पाठोपाठ असलेल्या गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, तमिळनाडू, कर्नाटक, राजस्थानचा हिस्सा एकेरी अंकाचा राहिला आहे. पश्चिम बंगाल, तेलंगण व आंध्र प्रदेशचा हिस्सा ५ टक्क्यांच्याही खाली राहिला आहे. नवीन ग्राहक जोडणीमध्ये शहर म्हणून मुंबईचा हिस्सा अर्थातच अधिक, ७.७ टक्के आहे. सर्वात कमी, एक टक्का हिस्सा हा कोलकता शहराचा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2020 12:42 am

Web Title: largest capital market in the country nse akp 94
Next Stories
1 ‘गोल्ड ईटीएफ’मध्ये गुंतवणूकस्वारस्य
2 निर्देशांकांच्या सलग दोन सत्रांतील घसरणीला खंड
3 वर्षांरंभीही वाहन विक्रीत घसरणच; जानेवारी २०२० मध्ये ६.२ टक्के घट
Just Now!
X