गेल्या तिमाहीत नफ्यात फार मोठी वाढ न नोंदविणाऱ्या सेन्सेक्समधील सूचिबद्ध लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो कंपनीचे बाजारमूल्य सोमवारी एकाच व्यवहारात तब्बल १०,३४२ कोटी रुपयांनी रोडावले. अभियांत्रिकी व पायाभूत सेवा क्षेत्रातील या आघाडीच्या समभागाचे मूल्य व्यवहारात तब्बल ८ टक्क्य़ांपर्यंत घसरले. दिवसअखेर मुंबई शेअर बाजारात त्याला शुक्रवारच्या तुलनेत ६.६१ टक्के कमी, १,५७३ रुपयांचा भाव मिळाला. तर राष्ट्रीय शेअर बाजार व्यासपीठावर तो ७.४४ टक्क्य़ांनी घसरत १,५५८.३५ रुपयांवर आला. कंपनी समभाग एकूण सेन्सेक्सच्या घसरणीतही सर्वोच्च स्थानी राहिला. यामुळे कंपनीचे मूल्य १,४६,१०७.९९ कोटी रुपयांवर आले. 

कंपनीने ऑक्टोबर ते डिसेंबर २०१४ या कालावधीत ८.७ टक्केच नफा नोंदविला. या कालावधीत कंपनीचा नफा ८६६.५४ कोटी रुपये झाला आहे. वर्षभरापूर्वीच्या ७९६.६६ कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात किरकोळ वाढ झाली आहे. कंपनीचा महसूल मात्र ९.६ टक्क्य़ांनी वाढून २४ हजार कोटी रुपयांवर गेला आहे.

लार्सन अ‍ॅन्ड टुब्रोने तिमाही वित्तीय निष्कर्षांत कमालीचा निराशाजनक प्रतिसाद नोंदविला आहे. कंपनीकडून अधिक नफावाढीची अपेक्षा व्यक्त करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या पदरी यापोटी निराशा पडली आहे.
संतोष येल्लापू, वरिष्ठ संशोधक विश्लेषक (पायाभूत), एंजल ब्रोकिंग.