अल्प बचत योजनांबरोबर आधार संलग्न करण्याची मुदत केंद्र सरकारने तीन महिन्यांपर्यंत वाढविली आहे. याबाबत सोमवारी घेतलेल्या निर्णयानुसार टपाल कार्यालयाच्या योजना, किसान विकास पत्र यासाठीची आधार संलग्नता आता ३१ मार्च २०१८ पर्यंत करता येणार आहे.

केंद्र सरकारच्या विविध गुंतवणूक व परतावा पर्याय असलेल्या योजनांसाठी यापूर्वी असलेली आधार संलंग्नतेची अंतिम तारिख ३१ डिसेंबर २०१७ रोजी संपली. बँक ठेवी, मोबाइल फोन तसेच अन्यकरिता आधार जोडणी सरकारने बंधनकारक केली आहे. अघोषित उत्पन्न व खर्चाचा सरकारकडे हिशेब राहावा यासाठी हे पाऊल नोटाबंदीनंतर सरकारने उचलले.

ऑक्टोबर २०१७ मध्ये सरकारने १२ अंकी आधार क्रमांक हा सर्व प्रकारच्या अल्पबचत योजनांशी संलग्न करण्याचा घोषित केले होते. त्यानुसार टपाल विभागाच्या बचत योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र आदींकरिता ते बंधनकारक करण्यात आले. अशा गुंतवणुकीसाठी अथवा नव्या खात्याकरिताही आधार क्रमांकांची नोंद सक्तीची करण्यात आली. सरकारतर्फे दिले जाणाऱ्या विविध अनुदानांच्या योजनांसह अशा सर्व योजनांची संख्या १३५ आहे.