अनेक कारणाने वादग्रस्त ठरलेल्या पुण्यानजीकच्या देशातील पहिल्या गिरीशहर प्रकल्पाची प्रवर्तक ‘लवासा कॉर्पोरेशन’ने मंगळवारी ‘सेबी’कडे खुल्या भागविक्रीसाठी (आय़पीओ) डीआरएचपी अर्थात मसुदा प्रस्ताव दाखल केला. हिंदुस्तान हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी (एचसीसी)च्या या उपकंपनीने १० रु. दर्शनी मूल्याच्या समभागांच्या खुल्या विक्रीतून ७५० कोटी रुपये उभे करण्याचे प्रस्तावित केले आहे. ‘लवासा’च्या या भागविक्रीच्या प्रस्तावामुळे एचसीसीच्या समभागाने मंगळवारी ५ टक्क्य़ांनी उसळी घेऊन वरचे सर्किट गाठले. मंगळवारी ‘बीएसई’वर कंपनीचा समभागाचा ४९ रु. भाव हा त्याचा वर्षांतील उच्चांकी भाव आहे.
‘लवासा’ने भागविक्रीसाठी ‘सेबी’कडे दुसऱ्यांदा प्रस्ताव दाखल केला असून, यापूर्वी २०१० साली दाखल केलेल्या प्रस्तावात कंपनीने भांडवली बाजारातून २००० कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य ठेवले होते. परंतु विपरीत बाजारस्थिती पाहता कंपनीला आपली योजना गुंडाळावी लागली होती.
एचसीसी या आघाडीच्या पायाभूत सोयीसुविधा निर्मात्या कंपनीचे लवासामध्ये ६४.९९ टक्के भागभांडवल आहे. एक रुपया दर्शनी मूल्य आणि ६४.५८ कोटी भरणा झालेले भागभांडवल असलेल्या एचसीसीच्या समभागाने केंद्रात मोदी सरकार आल्यापासून कात टाकली असून, ऑगस्ट २०१३ मध्ये ७.७५ रुपये अशा सार्वकालिक नीचांकाला पोहचलेल्या समभागाने त्यानंतर जवळपास सात पटीने वाढ दाखविणारी किमया साधली आहे.
अर्थात आर्थिक वर्ष २०१३-१४ च्या अंतिम म्हणजे मार्च तिमाहीत आधीच्या वर्षांतील ५०.२६ कोटी रुपयांच्या  तुलनेत, एचसीसीने      कमावलेल्या २४.४० कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्याचेही समभागाच्या चमकदार कामगिरीत योगदान आहे.