चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत आघाडीच्या मोबाईल कंपन्यांनी त्यांचे इंटरनेट दर १०० टक्क्य़ांपर्यंत वाढविलेले असतानाच नवी दूरसंचार कंपनी एमटीएसने मात्र हे दर ३३ टक्क्य़ांपर्यंत कमी केले आहेत. यामुळे दोन वर्षांपूर्वीचे दरयुद्ध पुन्हा एकदा दूरसंचार क्षेत्रात उफाळून आले आहे.
३३ टक्के दरकपातीसह कंपनीने इंटरनेटचे दर किमान पातळीवर आणून ठेवले असल्याचे एमटीएस इंडियाचे मुख्य विपणन अधिकारी लिओनिड मुसाटोव्ह यांनी म्हटले आहे. याचबरोबर कंपनीने नव्या पोस्टपेडधारकांसाठी ९९९ रुपयांचे एमब्लेझ अल्ट्रा हे वाय-फाय डोंगल उपलब्ध करून दिले आहे.
यापूर्वी त्याची किंमत १,४९९ रुपये होती. या डोंगलची किंमत स्पर्धकांच्या तुलनेत जवळपास अर्धी असल्याचा दावाही मुसाटोव्ह यांनी केला आहे. या डोंगलद्वारे प्रति सेकंद ९.८ मेगाबाईट वेग मिळतो. कंपनीने १० जीबी मोबाईल ब्रॉडबॅण्डची २,२९९ रुपये किंमती होता १,७४९ रुपयांवर आणून ठेवली आहे.
एअरटेल, व्होडाफोन, आयडिया या मोबाईल बाजारपेठेवर निम्मी मालकी असलेल्या कंपन्यांनी जून ते सप्टेंबर या दरम्यान इंटरनेटचे दर १०० टक्क्य़ांनी वाढविले. पैकी प्रत्येक कंपन्यांनी त्यांच्या विविध योजनांवर दुहेरी आकडय़ातील वाढ केली आहे. एअरटेलने सप्टेंबरच्या सुरुवातीला दरवाढ केली होती. पाठोपाठ व्होडाफोननेही इंटरनेट दर वाढविले होते. तर आयडियाने जुनमध्येच दरवाढ केली होती.
मोबाईल कंपन्यांच्या इंटरनेटचे दर वाढण्यास २०१२ मध्ये सुरुवात झाली होती. फेब्रुवारीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने १२२ दूरसंचार परवाने रद्द केल्यानंतर होणाऱ्या महसुली नुकसानातून सावरण्यासाठी कंपन्यांनी इंटरनेटचे दर वाढविले. विद्यमान स्थितीतही पसंतीच्या स्मार्टफोनद्वारे वाढत्या इंटरनेट वापरामुळे कंपन्या इंटरनेटचे दर वाढत्या क्रमाने राखण्यास उत्सुक आहेत.
इंटरनेट दरयुद्धाचे सध्याचे चित्र २००९-१० मधील कॉलदर स्पर्धेप्रमाणे निर्माण झाले आहे. प्रति सेकंद अर्धा पैसा या योजनेद्वारे त्यावेळी दूरसंचार कंपन्यांमध्ये दरयुद्ध निर्माण झाले होते.
येत्या महिन्यापासून स्कायपी बंद
लॅन्डलाईन व मोबाईलवरून चॅटची सुविधा असलेली मायक्रोसॉफ्टची स्कायपी ही यंत्रणा भारतात येत्या १० नोव्हेंबरपासून बंद करण्यात येणार आहे. देशाबाहेर असताना मोबाईलवरील ही सुविधा मात्र भारतीयांसाठी कायम ठेवण्यात येणार आहे. देशांतर्गत भागासाठी ही यंत्रणात बंद होणार आहे. स्काईपीवरून स्कायपीवरील कॉल (वाय-फायवरूनही) तसेच एसएमएस सेवा सुरू राहणार आहे. व्हॉट्सअप, विबर, वुईचॅटप्रमाणेच स्काईपी हीदेखील ओटीटी (ओव्हर द टॉप) संवाद सेवा आहे. इंटरनेटद्वारे फोन कॉल व एसएमएसची सेवेच्या माध्यमातून दूरसंचार कंपन्यांना मोठे आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रार आहे.
वुई फोन अ‍ॅपवर बंदी
स्कायपीप्रमाणेच सेवा देणारी वुई फोन अ‍ॅपही अडचणीत आली आहे. वुइ फोनच्या अ‍ॅपवर बंदी घालण्याचे आदेश गुन्हे तपास यंत्रणेने दूरसंचार विभागाला दिले आहेत. या अ‍ॅपमुळे आलेला कॉल ओळखणे दुरापास्त होत असल्याची यंत्रणेची भावना आहे. अ‍ॅप डाऊनलोड करताना कॉलर आयडी कार्यान्वित होऊन नंबर अदृश्य करण्याची यात सोय आहे. ज्या सव्‍‌र्हरवर हे अ‍ॅप चालते ते भारताबाहेर असल्याने त्याद्वारे केले जाणाऱ्या मोबाईलचा क्रमांकही अर्धवट येत असल्याचा यंत्रणेचा आक्षेप आहे.
सध्या हे अ‍ॅप अ‍ॅण्ड्रॉइड प्ले स्टोअर व अ‍ॅपलवर उपलब्ध आहे. वुई फोनद्वारे इंटरनेटद्वारे मोफत कॉल व एसएमएसची सुविधा आहे.