५०० कोटींची प्रारंभिक गुंतवणूक

जर्मनीस्थित लीबर हौसगेरेटची संपूर्ण अंगीकृत कंपनी लीबर अप्लायन्सेस इंडियाने महाराष्ट्रात औरंगाबाद येथे आपली ‘स्मार्ट’ शीतकरण उपकरणांच्या निर्मितीसाठी प्रकल्प स्थापण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पहिल्या टप्प्यात या प्रकल्पासाठी ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.

भारतीय बाजारपेठ आणि शेजारच्या देशांमध्ये निर्यातीसाठी प्रति वर्ष पाच लाख उपकरणांची उत्पादन क्षमता असलेला हा प्रकल्प असेल. त्यासाठी ३५,००० चौरस मीटरच्या जमिनीचे संपादन कंपनीने पूर्ण केले आहे. लीबरच्या या प्रस्तावित प्रकल्पाचे २०१८ सालात कार्यान्वयन आणि सुमारे एक हजार रोजगारनिर्मिती होणे अपेक्षित आहे.

भारतीय बाजारपेठेत विस्ताराच्या नियोजनाचा भाग लीबरने देशातील आपल्या पहिल्या स्वतंत्र शोरूमचे शुक्रवारी मुंबईत अंधेरी (पश्चिम) येथे उद्घाटन केले. त्या समयी लीबर समूहाच्या विपणन विभागाचे प्रमुख गुंथर स्प्रॉल यांनी देशात निर्मितीच्या योजनेची माहिती दिली.

जगभरात ५० देशांमध्ये विविध १३० कंपन्या आणि ४२,००० हून अधिक मनुष्यबळाद्वारे अस्तित्व फैलावलेल्या लीबर समूहाकडून वाणिज्य आणि घरगुती वापराच्या उंची रेफ्रिजरेटर आणि फ्रीजर उत्पादनांची निर्मिती केली जाते.

जागतिक तंत्रज्ञान अग्रणी मायक्रोसॉफ्टच्या स्मार्ट तंत्रज्ञानाचा कंपनीने आपल्या उत्पादनांमध्ये खुबीने वापर केला आहे.

भारतात अशा महागडय़ा रेफ्रिजरेटर उत्पादनांना मागणी वाढत असून, २०२५ सालापर्यंत ११.४ टक्के दराने ही बाजारपेठ विस्तारत जाईल, असा कयास गुंथर यांनी व्यक्त केला. सध्या या क्षेत्रात आपला कोणीही स्पर्धक नसल्याचे त्यांनी सांगितले.