सरकारकडून ‘ओपन सेल पॅनल’वरील आयात शुल्क रद्दबातल

नवी दिल्ली : एलसीडी, एलईडी या सारख्या अद्ययावत दूरचित्रवाणी संच ऐन सणांमध्ये स्वस्त होणार आहेत. सरकारने अशा बनावटीच्या उपकरणांवरील शुल्क रद्द केल्याने संचाच्या किमती ३ टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.

आकाराने १५.६ इंचापेक्षा मोठय़ा एलसीडी तसेच एलईडी दूरचित्रवाणी संचांमध्ये वापरल्या  जाणाऱ्या ‘ओपन सेल पॅनल’वरील ५ टक्के आयात शुल्क रद्द करण्यात आले आहे. विद्युत उपकरणातील ‘ओपन सेल’ अधिकतर प्रमाणात आयात करावे लागते. त्यासाठीच्या खर्चावर संच निर्मात्यांना ७० टक्क्यांपर्यंतचा वाढीव भार येतो. सरकारने जून २०१७ मध्ये आयात  होणाऱ्या ‘ओपन सेल’वर ५ टक्के शुल्क लागू केले होते.

दूरचित्रवाणी संचांसह अनेक विद्युत उपकरणांसाठीची मागणी गेल्या काही दिवसांपासून रोडावली आहे. भारतात येत्या दसरा-दिवाळीसारख्या सणांच्या मोसमात घरगुती वापराच्या विद्युत उपकरणांची विक्री आणखी रोडावण्याची भीती निर्मात्यांनी व्यक्त केली आहे.

बुधवारच्या शुल्क कपातीचा लाभ थेट ग्राहकांना पोहोचविण्याचा मानस ‘पॅनासॉनिक’ने लगेच व्यक्त केला. कंपनीच्या अद्ययावत तंत्रज्ञानावरील दूरचित्रवाणी संचाच्या किमती ३ ते ४ टक्क्यांपर्यंत कमी करेल, असेही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले.

वाढत्या शुल्कापोटी ‘सॅमसंग’ने गेल्या वर्षी तिचा भारतातील उत्पादननिर्मिती प्रकल्प व्हिएतनाममध्ये स्थलांतरित केला आहे. .

आकाराने ३२ इंचपेक्षा जास्त असलेल्या दूरचित्रवाणीवर सध्या सर्वाधिक, २८ टक्के वस्तू व सेवा कर आहे. तो एक टप्पा खाली आणत १८ टक्के करण्याची निर्माती कंपन्यांची मागणी आहे. भारतीय दूरचित्रवाणी संचनिर्मिती बाजारपेठ २२,००० कोटी रुपयांची आहे.