दरमहा किमान दोन स्र्माटफोन भारतीय बाजारात धडकतात. प्रत्येक फोनमध्ये काय नावीन्य असते, असा प्रश्न केला तर कोणतेही ठोस उत्तर देता येणे अशक्य आहे. यातच चिनी उत्पादनांमुळे नामांकित आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्सच्या विक्रीवर परिणाम झाल्याचे दिसू लागले आहे. यामुळेच या स्पध्रेत जय्यत तयारीनिशी उतरताना संशोधन व विकासावर भर देणे क्रमप्राप्त ठरत आहे. याचेच फलित म्हणून एलजीने बुधवारी नवी दिल्लीत भारतीय बाजारपेठेत दाखल केलेला जी५ हा फोन म्हणता येईल.
म्युझिक सिस्टीम, आभासी विश्वात रमविणारा, ३६० अंशांत छायाचित्रण करणारा कॅमेरा अशा एक ना अनेक नावीन्यपूर्ण सुविधांच्या बळावर एलजीने जी५ हा देशातील पहिला मॉडय़ुलर स्मार्टफोन बाजारात आणला. या फोनमुळे स्मार्टफोनच्या विश्वात एक नवा प्रयोग समोर आल्याचे मत एलजी ंइलेक्ट्रॉनिक्सचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक किम की वान यांनी व्यक्त केले. तर सध्या बाजारात येत असलेल्या फोन्समधील सुविधांचा विचार करता स्मार्टफोनमधील संशोधन आता संपले का असा प्रश्न निर्माण झाला होता; मात्र वापरकर्त्यांच्या हिताचा विचार करून त्यांना सोयीस्कर आणि त्यांच्या अधिकाधिक गरजा भागविण्याचा प्रयत्न या जी५ फोनच्या माध्यमातून केल्याचे या फोनची संकल्पना मांडून ती प्रत्यक्षात आणणारे एलजीचे विपणन विभागाचे प्रमुख अमित गुजराल यांनी स्पष्ट केले. या फोनसाबेत स्पीकर, आभासी जगतात रमविणारा चष्मा, ३६० अंशांत चित्रीकरण करता येऊ शकणारा कॅमेरा या गोष्टीही बाजारात आणल्या असून त्यामध्येही विशेष संशोधन करण्यात आले आहे. यामुळे हा फोन बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या इतर फोनच्या तुलनेत जास्त आधुनिक आणि उजवा ठरतो.
एलजी जी५ची किंमत ५२,९९० रुपये असून तो सध्या केवळ फ्लिपकार्ट या ई-व्यापार मंचावर उपलब्ध आहे.

एलजी इलेक्ट्रॉनिक्सचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक किम की वान आणि फॅशन डिझायनर निश्का लुल्ला बुधवारी नवी दिल्ली येथे जी५ या पहिल्या मॉडय़ुलर फोनच्या अनावरणाप्रसंगी