‘एलआयसी’च्या पश्चिम मंडळाची कामगिरी

मुंबई : भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी नऊ महिन्यांपूर्वी सादर केलेल्या कर्करोगावरील विमा योजनेच्या माध्यमातून पश्चिम परिमंडळाने २९.१६ कोटी रुपयांचे हप्ता संकलन केले आहे. तर अशा ६०,१८२ योजनांची विक्री या कालावधीत झाली आहे.

एलआयसीच्या पश्चिम परिमंडळाचे प्रमुख विपिन आनंद यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. एलआयसीने नोव्हेंबर २०१७ मध्ये सादर केलेल्या या योजनेच्या एकूण विमाधारकांपैकी ३० टक्के विमाधारक हे पश्चिम परिमंडळातील असल्याचेही त्यांनी सांगितले.

पश्चिम परिमंडळातील या योजनेच्या विमाधारकांपैकी १० टक्के विमाधारकांनी ऑनलाइन खरेदीच्या माध्यमातून ही योजना स्वीकारली आहे. योजना घेणाऱ्यांपैकी अधिकतर विमाधारक  ५० लाख रुपयांचे विमाछत्र असणारे आहेत. या योजनेकरिता अद्याप कोणाही विमाधारकाकडून दावा दाखल झालेला नाही, असेही आनंद यांनी स्पष्ट केले.

कंपनीच्या पश्चिम परिमंडळाच्या आरोग्य विमा विभागाचे विभागीय व्यवस्थापक रॉय मॅथ्यूज, विपणन विभागाचे विभागीय व्यवस्थापक प्रसाद दासगुप्ता, तसेच विभागीय व्यवस्थापक प्रशांत नायक आदी यावेळी उपस्थित होते.

‘कॅन्सर कव्हर’ नावाच्या या विमा योजनेकरिता २० ते ६५ वर्षे वयमर्यादा असून योजनेचा कालावधी किमान १० ते कमाल ३० वर्षे आहे. विमाछत्र किमान १० लाख व कमाल ५० लाख रुपये आहे.