भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी ही विमा कंपनी देशाच्या भांडवली बाजारातील  एक तगडी गुंतवणूकदार संस्थाही असून, गेले वर्षभर अभूतपूर्व तेजीत असलेल्या शेअर बाजारातील तिच्या २०१४-१५ आर्थिक वर्षांतील उलाढालीतून विक्रमी नफ्याची शक्यता दिसून येत आहे. अर्थात ही बाब एलआयसीच्या पॉलिसीधारकांच्या दृष्टीने लाभकारक ठरणारी असेल.
एलआयसीकडून शेअर बाजारातील विविध समभागांमध्ये वार्षिक साधारण ४० हजार कोटींची उलाढाल केली जाते. बाजार तेजीत असताना केलेल्या समभागांच्या आंशिक विक्रीतून एलआयसीचा चालू आर्थिक वर्षांत तब्बल ३० हजार कोटी रुपयांच्या घरात जाणारा असेल, असे अपेक्षिले जात आहे.
एलआयसीने गेल्या वर्षी २०१३-१४ सालात समभागांतील गुंतवणुकीची विक्री करून साधारण २३ हजार कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. तर चालू वर्षांत सप्टेंबर आणि डिसेंबर तिमाहीदरम्यान काही समभागांची विक्री करून एलआयसीने जवळपास २० हजार कोटींचा नफा गाठीशी बांधूनही घेतला आहे. तरीही ढोबळ अंदाजाप्रमाणे एलआयसीच्या विविध समभागांत सध्या असलेली ही गुंतवणूक सुमारे ३७,००० कोटी रुपयांच्या घरात नफा दाखविणारी आहे.

पॉलिसीधारकांना फायदा कसा?
एलआयसीकडे गोळा होणारा निधी हा पॉलिसीधारकांनी भरलेल्या हप्त्यांचाच असल्याने, होणाऱ्या नफ्यातही पॉलिसीधारकच हिस्सेदार ठरतील. एलआयसीचा नफ्याच्या पॉलिसींचे (मनी बॅक, एंडोमेंट, होल लाइफ वगैरे पारंपरिक योजना) प्रमाण खूप मोठे असून, तिच्या जवळपास ३० कोटी पॉलिसीधारकांमध्ये या योजनांचाच भरणा अधिक आहे. या पॉलिसीधारकांसाठी एलआयसीकडून तिच्याकडून कमावल्या जाणाऱ्या वरकड उत्पन्नातून (सरप्लस) द्वारे दरसाल सुधारित स्वरूपात बोनस लाभ जाहीर केला जातो, जो मुदतपूर्तीसमयी अतिरिक्त लाभ म्हणून पॉलिसीधारकांना दिला जातो. पॉलिसीची मुदत आणि मूल्य यानुसार बोनसचे हे प्रमाण कमी-अधिक होत असते. शिवाय एलआयसीची ९५ टक्के मालकी आजही भारत सरकारची असल्याने, एलआयसीच्या उत्पन्नात वाढ म्हणजे केंद्राच्या खजिन्यालाही लाभांशरूपाने अधिक लाभ मिळणार आहे.