News Flash

भांडवली बाजारातील गुंतवणूक धोरणावर ‘एलआयसी’ ठाम!

एलआयसीला भागभांडवलाच्या १५ टक्क्यांच्या वर एखाद्या कंपनीत गुंतवणूक करता येत नाही.

एलआयसीचे अध्यक्ष व्ही. के. शर्मा

विविध कारणांनी चर्चेत असलेल्या कंपन्या, बँका तसेच वित्त संस्थांमधील विद्यमान गुंतवणूक धोरणच तूर्त कायम राहणार असल्याचे देशातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी आणि गुंतवणूकदार संस्था असलेल्या एलआयसीने स्पष्ट केले आहे. मात्र नियत मर्यादेपल्याड गुंतवणूक वाढविण्याचा विचार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

सार्वजनिक क्षेत्रातील एकमेव आयुर्विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाची  अर्थात एलआयसीची आयटीसीमधील गुंतवणूक चर्चेची बनली आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असलेल्या  याचिकेनंतर एलआयसीच्या भूमिकेबाबत उत्सुकता आहे. कोटय़वधी भारतीयांच्या सुसह्य़ जीवनासाठी एलआयसीला कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या सिगारेट उत्पादक कंपनीतील गुंतवणुकीबाबत याचिकाकर्त्यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. मात्र एलआयसीचे अध्यक्ष व्ही. के. शर्मा यांनी आयटीसीतील गुंतवणूक तूर्त आहे तशीच राहणार असल्याचे स्पष्ट केले. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर अधिक काही भाष्य त्यांनी केले नाही.

देशातील एक मोठी कंपनी असलेल्या आयटीसीचा सिगारेट व्यवसाय एकूण व्यवसायाच्या यापूर्वीच्या ९० टक्क्यांवरून ४५ टक्क्यांवर आल्याचे शर्मा यांनी गुंतवणुकीच्या समर्थनार्थ विधान केले. गुंतवणुकीच्या निर्णयात आकर्षक परताव्यापेक्षा गुंतवणूकदारांचे भांडवल जोपासले जाऊन त्यात वाढ याला आपण प्राधान्य देतो. एस्सार ऑइल, आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल, अ‍ॅक्सिस बँक, यूटीआय म्युच्युअल फंड आदी एलआयसीची गुंतवणूक असलेली काही उदाहरणे त्यांनी या वेळी दिली.

एलआयसीला भागभांडवलाच्या १५ टक्क्यांच्या वर एखाद्या कंपनीत गुंतवणूक करता येत नाही. मात्र या प्रमाणावर गेलेल्या गुंतवणुकीसाठी एलआयसीला संबंधित नियामकांची विशेष परवानगी घ्यावी लागते. यापुढे अशा वाढीव मर्यादेची परवानगी घेण्याचा विचार नसल्याचेही शर्मा यांनी यानिमित्ताने स्पष्ट केले.

बाजारातील गुंतवणुकीचे एलआयसीचे धोरण यापुढेही अल्प जोखीम घेऊन समाधानकारक परतावा या आधारावर कायम अवलंबिलेले असेल, असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 2:35 am

Web Title: lic firm on capital market investment policy
Next Stories
1 एटीएममधील नोटांचा खडखडाट सायबर हल्ल्यामुळे नव्हे!
2 मान्सून चाहुलीनं ‘सेन्सेक्स’ भरारी!; निफ्टीही ९५०० पल्याड!
3 पुन्हा नवे शिखर
Just Now!
X