मुंबई : आघाडीच्या गृहवित्त कंपन्यांपैकी एक असलेल्या एलआयसी हाऊसिंग फायनान्सने (एलआयसीएफएफ) प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत एक लाख लाभार्थ्यांना कर्ज वितरण करून एक नवीन टप्पा गाठला आहे. परवडणाऱ्या घरांसाठीच्या कर्ज वितरणावर कंपनीने लक्ष केंद्रित केल्याचे हे फलित मानले जाते.

या यशाबद्दल भाष्य करताना, एलआयसीएचएफचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ मोहंती म्हणाले, वर्ष २०२२ पर्यंत केंद्र सरकारच्या सर्वांसाठी घरे या मोहिमेंच्या उद्देशाने आम्ही कटिबद्ध आहोत. आजपर्यंत आम्ही परवडणाऱ्या घरांसाठी १,४०० कोटी रुपयांचे कर्जवाटप केले असून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत परवडणाऱ्या घरांसाठीच्या कर्ज वितरणात कंपनीने आघाडी घेतली आहे. चालू वित्त वर्षच्या पहिल्या सहा महिन्यात या योजनेंतर्गत २५,००० बिगर कर्ज खाती सुरू करण्यात आली असून एकूण कर्जदारांपैकी २४ टक्के कर्जदार आणि किरकोळ वितरीत कर्जापैकी २६ टक्के कर्जे परवडण्याजोग्या घरांसाठी दिली आहेत.

वर्षभरात केंद्र सरकारने परवडण्याजोग्या घरांसाठी अनेक धोरणात्मक बदल केले असून ४५  लाख रुपयेपर्यंतच्या घरांसाठी गृह कर्जावरील व्याजावर १.५० लाख रुपयेपर्यंतची अतिरिक्त करात सूट देण्यात आली आहे.