भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) प्रायोजक असलेल्या एलआयसी नोमुरा म्युच्युअल फंडाच्या संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) या पदावर सरोजिनी दिखले यांच्या नियुक्तीची सोमवारी घोषणा झाली. भारतात मालमत्ता व्यवस्थापन क्षेत्रातील कंपनीच्या नेतृत्वस्थानी पहिल्यांदाच महिला अधिकारी नियुक्त केली जाण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.
नीलेश साठे यांच्या भारतीय विमा विकास व नियामक प्राधिकरणावर (आयआरडीए) नियुक्तीनंतर, त्यांनी एलआयसी नोमुराच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा दिला. या रिक्त झालेल्या पदाचा कार्यभार दिखले स्वीकारतील.
मुंबई विद्यापीठातील पदवीधर, अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी आणि इंटरनॅशनल  इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड मार्केटिंगमधून पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून दिखले या एलआयसीच्या सेवेत डायरेक्ट रिक्रुट ऑफिसर म्हणून १२व्या तुकडीतून सहभागी झाल्या. विमा क्षेत्राचा ३२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या दिखले यांनी कायद्याची पदवीही मिळविली असून, इन्श्युरन्स इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाच्या असोसिएट आहेत. आयुर्विमा क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी स्थापित नॅशनल इन्श्युरन्स अकॅडमी (एनआयए)मधील उल्लेखनीय प्रशिक्षक म्हणून त्यांना सन्मानितही करण्यात आले आहे. या नवीन नियुक्तीपूर्वी त्या एलआयसी नोमुरा म्युच्युअल फंडात कार्यकारी संचालिका म्हणून काम पाहत होत्या.