मुंबई : आयुर्विमा क्षेत्रातील अग्रणी भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीच्या पश्चिम विभागाने वैयक्तिक नवीन व्यवसायाच्या नोंदीत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. एलआयसीच्या कोणत्याही क्षेत्रीय विभागाला आजवर शक्य न झालेली, म्हणजे वर्षभरात ३४.४३ लाख नवीन पॉलिसींची विक्री करून ९,००२ कोटी रुपयांचे पहिल्या हप्त्यापोटी उत्पन्न मिळविण्याची कामगिरी पश्चिम विभागाने करून दाखविली आहे.

एलआयसीचे देशभरात आठ प्रादेशिक विभागानुसार कार्य चालते, त्यात एक पश्चिम विभागाचे हप्त्यापोटी उत्पन्नातील योगदान २१ टक्के आहे. महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि दमन-दीव यांचा समावेश असलेल्या एलआयसीच्या पश्चिम विभागाचे क्षेत्रीय व्यवस्थापक विपिन आनंद यांच्या मते, आर्थिक वर्षांच्या उत्तरार्धात आलेल्या नवीन योजनांची मुख्यत: विक्रीतून ही विक्रमी कामगिरी करता आली आहे. किमान एक कोटी रुपयांचे विमा कवच असलेली जीवन शिरोमणी त्याचप्रमाणे बीमा श्री या योजना खासच लोकप्रिय ठरल्या आणि पश्चिम विभागाच्या हप्त्यापोटी संग्रहणात वाढीत त्यांचे मोठे योगदान आहे.

जीवन अक्षय्य-६ सारख्या पेन्शन योजनेच्या असाधारण कामगिरीचे महत्त्वपूर्ण योगदान असून, या एकल प्रीमियम योजनेतून ४,६०० कोटी रुपयांचे हप्त्यापोटी उत्पन्न मिळाले. तसेच कर्करोगावर विमा कवच बहाल करणाऱ्या योजनांची विक्रीतही पश्चिम विभागाची कामगिरी अव्वल राहिली, असे विपिन आनंद म्हणाले. पेन्शन आणि गट विम्यातून नवीन व्यवसायापोटी उत्पन्नातही पश्चिम विभागाने १३,२०० कोटींच्या लक्ष्यापेक्षा खूप अधिक १९,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यवसाय केला आहे.

पंतप्रधान वय वंदना योजनेत ९१,०६४ ज्येष्ठ नागरिकांना लाभ पोहोचविताना पश्चिम विभागातून ४,०२९ कोटी रुपये उभारण्यात आले. या योजनेतून मुदतपूर्ती लाभ दावे मंजुरीचे प्रमाण ९९.१६ टक्के तर एकंदर दावे निवारण प्रमाण ९९.९५ टक्के असे आहे. पश्चिम विभागात विशेष मोहिमेअंतर्गत विपगत तसेच रद्द झालेल्या १८,९३,९१३ पॉलिसी पुनरुज्जीवित केल्या.