फेब्रुवारीतील नवीन आयुर्विमा संकलन १८,२०० कोटी रुपयांवर

देशातील आयुर्विमा कंपन्यांकडून जमा होणाऱ्या पहिल्या विमा हप्त्याचे उत्पन्न यंदाच्या फेब्रुवारीमध्ये १८,२०९.५० कोटी रुपये झाले आहे. वार्षिक तुलनेत यंदा त्यात ३२.७ टक्क्यांची वाढ झाली आहे. वर्षभरापूर्वी पहिल्या विमा हप्त्याच्या माध्यमातून १३,७२४.९६ कोटी रुपये उत्पन्न झाले होते.

आयुर्विमा क्षेत्रात सर्वाधिक, ६६.२६ टक्के हिस्सा असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या नव्या विमा हप्ता संकलनात यंदाच्या फेब्रुवारीमध्ये ४२.२ टक्के वाढ झाली असून एकमेव सार्वजनिक आयुर्विमा कंपनीने १२,०५५.८१ कोटी रुपये नवीन मासिक हप्ता संकलन केले आहे.

‘भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणा’नुसार उर्वरित आयुर्विमा कंपन्यांचा बाजारहिस्सा ३४ टक्के असून नवीन विमा हप्ता उत्पन्नात त्यांचा वाटा २३ टक्के आहे. त्यांचे एकत्रित विमा हप्ता उत्पन्न १७.२५ टक्क्यांनी वाढून ६,१५३.७० कोटी रुपये झाले आहे.

खासगी आयुर्विमा कंपन्यांमध्ये स्टेट बँकेचे विमा हप्ता संकलन ४९ टक्क्यांनी वाढून १,०५५.३२ कोटी रुपये झाले आहे, तर आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफचे उत्पन्न ३३.१ टक्क्यांनी वाढत १,०३९.१४ कोटी रुपये झाले आहे, तर आदित्य बिर्ला सन लाइफच्या उत्पन्नात २१.६ टक्के भर पडून ते २२२.२६ कोटी रुपये झाले आहे. अविवा लाइफच्या नव्या विमा हप्ता उत्पन्नात ५९.३ टक्के वाढ होऊन ही रक्कम ४८.२६ कोटी रुपये, तर मॅक्स लाइफच्या संकलनात २३.७ टक्के वाढ होत रक्कम ५२९.७७ कोटी रुपये झाली आहे. कोटक महिंद्र लाइफचे नवे मासिक विमा हप्ता उत्पन्न १५.२५ टक्क्यांनी वाढून ४०३.०१ कोटी रुपये झाले आहे.

एचडीएफसी लाइफ, डीएचएफएल प्रॅमेरिका लाइफ, भारती अक्सा लाइफ, बजाज अलायन्झ लाइफना मासिक विमा हप्ता संकलनात यंदा घसरणीला सामोरे जावे लागले आहे. एप्रिल ते फेब्रुवारी या २०१८-१९ या चालू आर्थिक वर्षांतील ११ महिन्यांमध्ये २४ आयुर्विमा कंपन्यांचे नवीन विमा मासिक उत्पन्न ७.६० टक्क्यांनी वाढले असून ते १,७७,२१३.५७ कोटी रुपये झाले आहे.

  • एलआयसी – १२,०५५.८१ (+४२.२%)
  • स्टेट बँक – १,०५५.३२ (+४९%)
  • आयसीआय.प्रु. – १,०३९.१४ (+३३.१%)
  • आदित्य बिर्ला – २२२.२६ (+२१.६%)