मुंबई : जीवन विमा क्षेत्रात ऑक्टोबरमध्ये वाढ झाली. सरलेल्या महिन्यातील जीवन विम्याच्या पहिल्या हप्ता संकलनात ३१.९ टक्के वर्षांगणिक वाढ झाल्याचे भारतीय विमा विकास आणि नियामन प्राधिकरणाच्या मासिक आकडेवारीतून समोर आले आहे.

जीवन विम्याचा प्रथम हप्ता म्हणून जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान गेल्या वर्षी गोळा झालेल्या १.४३ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत, या वर्षी याच कालावधीत १.४७ लाख कोटी रुपयांचे विमा हप्ता संकलन झाले. प्रथम हप्ता संकलनात चार महिन्यांत पहिल्यांदा वाढ झाली. ही वाढ एकल विमा हप्ता असणाऱ्या योजनांच्या माध्यमातून दिसत असून, ‘सिंगल प्रीमियम पॉलिसीं’चा हप्ता वजा केल्यास विमा हप्ते संकलनात घट झाल्याचे दिसते. एकल विमा हप्ता असणाऱ्या योजना गुंतवणूक प्रकारात मोडणाऱ्या असून नियमित उत्पन्नासाठी खरेदी केल्या जातात. वार्षिक विमा संरक्षण रकमेचा विचार केल्यास, जानेवारी ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीत विमा कंपन्यांनी २५.५ लाख कोटींचे विमा संरक्षण विकले होते. २०२० मध्ये याच कालावधीत संरक्षण रक्कम २३.६ लाख कोटींवर घसरल्याचे आकडेवारी दर्शवते मागील वर्षांच्या तुलनेत या वर्षी विमा संरक्षण रकमेत ७.४ टक्के घट झाली. भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) च्या जानेवारी ते ऑक्टोबर कालावधीतील विमा हप्ता संकलनात २.१ टक्के वाढ झाली असून ऑक्टोबरमधील प्रथम विमा हप्ता संकलनात ३७.७ टक्के वृद्धी झाली असल्याचे आकडेवारी सांगते. खासगी विमा कंपन्यांच्या प्रथम हप्ता संकलनात जानेवारी ते ऑक्टोबर २०२० दरम्यान ५.५ टक्के वाढ झाली असून ऑक्टोबरमधील वाढ १९.४ टक्के आहे.

साथीच्या आजारामुळे संरक्षण योजनांच्या मागणीत वाढ झाली आहे, तर गुंतवणूक प्रकारातील नफ्याचा भागीदार असलेल्या ‘पार्टीसिपेटरी’ प्लानच्या विक्रीवर बाजाराच्या अस्थिरतेवर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. मागील वर्षीच्या एका अंकातील वृद्धीदराच्या तुलनेत या प्रकारच्या विमा योजनांनी यंदा दोन आकडय़ांत वाढ नोंदविली आहे, अशी ही आकडेवारी सांगते.

करोनाकाळात लोकांना विम्याचे महत्त्व पटले आहे. टाळेबंदीमुळे विमा प्रतिनिधींच्या फिरण्यावर बंधने असताना विमा नियामकांनी व्यवसायस्नेही भूमिका घेतली. विमा हप्ता संकलनातील चार वर्षांच्या सततच्या घसरणीनंतर पहिला हप्ता संकलनात सातत्याने जी वाढ होत आहे त्यात सर्वात मोठा वाटा नियामकांचा आहे. बदलत्या परिस्थितीला अनुसरून नियामकांनी व्यवसाय करण्याच्या पद्धतीत जे बदल केले, सवलती दिल्या त्याची परिणती विमा हप्ता संकलानातील वाढीत दिसून आली आहे.   

– विघ्नेश शहाणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयडीबीआय फेडरल लाइफ इन्शुरन्स.