भांडवली बाजाराने गेल्या आठवडय़ात पुन्हा उभारी घेतली. चाहूल असलेला चांगला पाऊस, मंजुरीच्या वाटेवरील वस्तू व सेवा कर विधेयक या पाश्र्वभूमीवर देशातील कंपनी क्षेत्रच नव्हे, तर बाजारही दोन तिमाहीत उंचावेल, असा विश्वास प्रिन्सिपल पीएनबी असेट मॅनेजमेंट कंपनीचे इक्विटी हेड पी. व्ही. के. मोहन व्यक्त करतात.
3

* स्थानिक, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा भांडवली बाजारावरील परिणाम तुम्ही कसा पाहता?
भारतीय भांडवली बाजाराच्या चढ-उतारासाठी स्थानिकच काय, पण आंतरराष्ट्रीय घटक, तेथील घडामोडी निश्चितच परिणाम करणाऱ्या असतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यामानाने सध्या स्थिरता दिसते. भारताबाबत सांगायचे तर येथील आगामी घडामोडी सकारात्मक असतील, अशी आशा आहे. यंदा पाऊस सरासरीपेक्षा अधिक असण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्याचबरोबर वस्तू व सेवा कर विधेयक यंदाच्या संसदेच्या अधिवेशनात मंजूर होण्याबाबत आशा आहे. मार्च २०१६ अखेरचे कंपन्यांचे तिमाही निकाल तुलनेत ठीक आहेत. रुपया आणि खनिज तेल दरातील उतार-चढ चिंताही तुलनेत सध्या कमी आहे.

* असे असेल तर भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक यादरम्यान वरच्या टप्प्यावर जायला हरकत नाही..
यंदाच्या अर्थसंकल्पाच्या वेळी निफ्टी ६,८०० च्या जवळपास होता. सध्याचा त्याचा स्तरही तुलनेत चांगला असाच मानावा लागेल. ८,२०० ला त्याने गेल्या आठवडय़ात मागे टाकले, पण म्हणून निर्देशांक लगेचच अधिक उंचावतील, असे नाही. अर्थव्यवस्थेला गती देणाऱ्या घडामोडी तीव्रतेने घडल्यास त्याचे परिणाम जाणवण्यास आणखी एखादी तिमाही जाऊ द्यावी लागेल, पण एकूण चालू आर्थिक वर्षअखेर निफ्टीचा प्रवास दुहेरी आकडय़ातील टक्केवारीत राहील, असे वाटते. बाजारात मध्यंतरात काहीसा निर्देशांक तळ नोंदविला जाण्याची शक्यता आहे.

* मग आंतरराष्ट्रीय घडामोडी आता भारतीय बाजारासाठी चिंताजनक नाही आणि देशांतर्गत घटनांवर बाजाराचा आगामी प्रवास अधिक अवलंबून असेल, असे म्हणायचे काय?
आंतरराष्ट्रीय स्तरावर आशियाकडे बघितले तर चीनमध्ये अद्यापही मंदीचे वातावरण आहे. जपानमध्येही अर्थव्यवस्थेच्या हितार्थ निर्णय घेतले जात आहेत. तिकडे अमेरिकेतील रोजगारादी आकडेवारी सकारात्मक येत आहे. तिथे फक्त आता फेडरल रिझव्‍‌र्हच्या लवकरच जाहीर होणाऱ्या व्याजदर वाढीची प्रतीक्षा आहे. अर्थात ते आपल्यासाठीही महत्त्वाचे ठरणार आहे. रिझव्‍‌र्ह बँक मात्र यंदा लगेचच व्याजदर कपात करणार नाही. मान्सूनचा प्रवास आणि त्याचे महागाई वगैरे अन्य घटकांवर होणाऱ्या परिणामांनंतर दरकपातीबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणाप्रमाणेच सरकारची अर्थव्यवस्थेसाठीची अन्य धोरणेही बघावी लागतील.
* पी-नोट्सवरील र्निबध, सरकारच्या द्विवर्षपूर्तीनंतरही वेग न घेणारी अर्थव्यवस्था या पाश्र्वभूमीवर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या काही दिवसांत बाजारातून पाय काढलेला दिसला. मग ते पुन्हा आकर्षित होतील का?
येथील भांडवली बाजारातील गेल्या वर्षभराचे चित्र हे काहीसे असेच होते, असे म्हणायला पुरेसा वाव आहे. सरकार, बाजाराकडून गुंतवणूकदारांची निराशा या कालावधीत झालेली दिसली. यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी बाजारातून आपली रक्कम काढूनही घेतली. मात्र असे असूनही आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची स्थिती चांगली आहे, असे म्हणता येईल.
यंदाच्या जानेवारी-फेब्रुवारीदरम्यान हेज फंडांनी बँकांमध्ये गुंतवणूक केलेली आपण पाहिली आहे. यंदा मात्र काही प्रमाणात मूल्यवाढ होऊ शकते. आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलर भक्कम होत आहे. तेव्हा विदेशी गुंतवणूक, परदेशी गुंतवणूकदार संस्था पुन्हा येथील बाजाराकडे वळताना निश्चितच दिसतील.

* समभाग व्यवहाराच्या दृष्टीने नजीकच्या आगामी कालावधीत कोणते क्षेत्र लाभदायी व कोणते क्षेत्र सावधगिरीचे वाटतात?
भारतातील बँक क्षेत्रावरील दबाव अजूनही काही काळ जाणवण्याची शक्यता आहे. हे झाले सार्वजनिक क्षेत्रातील बँकांबाबत. त्यांना सरकारकडून पूर्ण भांडवल साहाय्य मिळत नाही तोपर्यंत आणि जोपर्यंत वाढत्या बुडीत कर्जाची समस्या निस्तरत नाही तोपर्यंत हे क्षेत्र काहीसे अस्थिर राहणार आहे.
तुलनेत खासगी बँका वेगाने व्यवसाय करतील. अन्य क्षेत्रांमध्ये वाहन तसेच वाहनांचे सुटे भाग, त्यातही दुचाकी, कृषी निगडित वाहन-उपकरणे यांना चांगली संधी आहे. स्थावर मालमत्ता, पायाभूत सेवा क्षेत्रालाही तशी बऱ्यापैकी साथ मिळेल. दूरसंचार, पोलाद, खनिकर्म, सिमेंट आदींबाबत यंदा सावधतेने घ्यावे लागेल.