तीन निवडणुकांमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी कर्जमाफीला विरोध दर्शवला आहे. ‘कर्ज माफीचा लाभ गरीब शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. तसेच राज्याच्या तिजोरीवरील ताणही वाढतो’, असे त्यांनी म्हटले आहे.

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. या तीन राज्यांमधील पराभव भाजपाच्या जिव्हारी लागला आहे. शेतकरी वर्ग सत्ताधाऱ्यांवर नाराज असल्यानेच हा पराभव झाल्याचे सांगितले जाते. देशातील शेतकरी संघटनांही कर्जमाफीच्या मागणीवरुन आक्रमक झाल्या असून केंद्र सरकारकडून यासंदर्भात लवकरच घोषणा केली जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

या पार्श्वभूमीवर रघुराम राजन यांनी कर्जमाफीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणतात, कर्जमाफीची माहिती असलेल्या निवडक शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळतो. गरीब शेतकरी मात्र यापासून वंचितच राहतो. तसेच कर्जमाफी जाहीर केल्यानंतर सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक ताण पडतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, शेतकरी कर्जमाफीला यापूर्वीही अर्थतज्ज्ञांनी विरोध दर्शवला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालातही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हा उपाय ठरु शकत नाही, असे मत व्यक्त केल्याचे वृत्त समोर आले होते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील कर्जमाफी हा एकमेव उपाय नसल्याची कबुली दोन दिवसांपूर्वी दिली होती.

रघुराम राजन यांनी यापूर्वीही दर्शवला होता विरोध

रघुराम राजन यांनी यापूर्वीही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला विरोध दर्शवला आहे. चार वर्षांपूर्वी आरबीआयच्या गव्हर्नरपदी असताना भारतीय आर्थिक संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतही त्यांनी कर्जमाफीवर शंका व्यक्त केली होती. शेतकऱ्यांना दिली जाणारी कृषी कर्जमाफी कितपत परिणामकारक आहे, शेतकऱ्यांना दिले जाणारे कर्ज योग्य कारणासाठी वापरले जाते की नाही, हे तपासून घेतले जाते का, कृषी क्षेत्राला दिल्या जाणाऱ्या अनुदानाचा शेतीला खरोखरीच फायदा झाला आहे का.. असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते.