काळया पैशांचा विषय निघाला की, प्रत्येकाच्या ओठावर पहिले नाव येते ते स्विस बँकेचे. वेळोवेळी स्विस बँकेत कुठल्या भारतीयांची खाती आहेत. भारताचा किती पैसा तिथे जमा आहे त्याची माहिती समोर येत असते. मागच्या काहीवर्षात भारतीयांनी स्विस बँकेत पैसा ठेवण्याचे प्रमाण कमी केले आहे. २०१६ च्या तुलनेत २०१७ मध्ये भारतीयांच्या स्विस बँकेतील लोन आणि डिपॉझिटमध्ये ३४.५ टक्के घट झाली आहे. मंगळवारी संसेदत ही माहिती देण्यात आली.

२०१३ ते २०१७ दरम्यान भारतीयांच्या स्विस बँकेतील लोन आणि डिपॉझिटमध्ये ८०.२ टक्के घट झाली आहे. अर्थ राज्यामंत्री शिव प्रताप शुक्ला यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लिखित उत्तरामध्ये ही माहिती दिली. स्विस बँकेत जमा होणाऱ्या पैशांची लगेच माहिती मिळावी यासाठी भारत आणि स्वित्झर्लंडमध्ये करार झाला आहे.

सप्टेंबर २०१९ पासून सरकारला यासंबंधी माहिती मिळण्यास सुरुवात होईल. त्यामुळे काळया पैशांविरोधात महत्वाची माहिती मिळू शकते. भ्रष्टाचारविरोधी लढाईत हा करार महत्वपूर्ण ठरणार आहे. करारासाठी कायदेशीर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून सप्टेंबर २०१९ पासून स्वित्झर्लंडमधल्या बँकेत ज्या भारतीयांची खाती आहेत त्यांच्यासंबंधी माहिती मिळण्यास सुरुवात होईल. वर्ष २०१८ आणि त्यानंतरच्या वर्षांची माहिती मिळणार आहे. या करारामुळे ज्या भारतीयांचे बेहिशोबी उत्पन्न आणि मालमत्ता आहे त्याची माहिती मिळेल व त्यांना त्यासाठी कर कक्षेत आणले जाईल असे शुक्ला यांनी सांगितले.